कोरेगाव भीमा येथील अल अमीन महाविद्यालयात केली सोय
शिक्रापूर (वार्ताहर) -करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेला बंद तसेच संचारबंदीमध्ये संपूर्णपणे बंद असलेली वाहतूक व्यवस्था आणि बंदमुळे उपासमारीची वेळ येऊ लागल्याने अनेक परप्रांतीय नागरिक गावी पायी चाललेले असताना शिक्रापूर पोलिसांनी सर्वांना एकत्र केले. त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करत गावी पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना दिलासा दिला आहे.
शिक्रापूर जवळील पुणे-नगर रस्त्याने अनेक परप्रांतीय नागरिक पिशव्या भरून पायी जात असल्याचे शिक्रापूर पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही पोलिसांनी त्या नागरिकांची विचारपूस केली असताना “आम्ही कामाला म्हणून इकडे आलो होतो, सध्या काम देखील नाही, कोठे खाण्यापिण्याची सोय नाही, करणार काय म्हणून गावाला निघालो. गाड्या पण बंद आहेत, करणार काय? आम्हाला काय करावे सुचेना म्हणून आम्ही आता पायी रस्त्याने चालत आहे. कोठे काही मिळाले तर खातोय’ असे सांगत ते सर्व परप्रांतीय मध्यप्रदेशला निघाले.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक किरण भालेकर, हवालदार संजय ढमाळ, सचिन मोरे, पोलीस नाईक विलास आंबेकर, ब्रम्हा पोवार यांनी सर्वांना एका वाहनात बसवून कोरेगाव भीमा येथील अल अमीन कॉलेजमध्ये घेऊन जात त्यांना समजावून सांगत तेथे त्यांच्या राहण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था केली. यावेळी महसूल विभागाचे देखील काही कर्मचारी येथे उपस्थित झाले होते. जोपर्यंत बंद आहे आणि सर्व सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत या सर्व नागरिकांची सर्व व्यवस्था व्यवस्थितपणे केली जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण भालेकर यांनी सांगितले.,