वॉर्डनिहाय आरक्षणानंतर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल प्रमुखांची लगबग सुरू
मांडवगण फराटा -ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने गावोगावी राजकीय वातावरण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. आता सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले की गावोगावी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे वातावरण नक्कीच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
जुलै अखेरपर्यंत मुदत संपत असलेल्या शिरूर तालुक्यातील तब्बल 73 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वत्र निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. युती सरकारच्या काळात फडणवीस सरकारने जुलै 2017 मध्ये थेट सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होती; परंतु महा विकास आघाडी सरकारने 28 जानेवारीच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच निवड रद्द करून ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारे सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे गेली पाच वर्षे सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या पुढाऱ्यांमध्ये “कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु स्वतःला सरपंच होण्यासाठी प्रयत्न करणारी नेतेमंडळी आता आपल्या विचारांचे पॅनल निवडून कसे आणता येईल, यासाठी व्यूहरचना करण्यात दंग झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत.
शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील इनामगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, बाभुळसर बुद्रुक, वडगाव रासाई, कुरूळी, नागरगाव, आंधळगाव, कोळगाव डोळस, सादलगाव, गणेगाव दुमाला, आलेगाव पागा, तांदळी आदी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर काही पॅनल प्रमुखांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांना घेऊन पर्यटनही घडून आणले आहे. गेली पाच वर्षे झालेली स्वयंघोषित नेते मंडळी लग्न, वाढदिवस, यात्रा, जत्रा, सप्ताहाच्या माध्यमातून संपर्क करण्याचा आटापिटा करू लागले आहेत.
आर्थिक ताकद व जनसंपर्क महत्त्वाचा
ज्या गावांच्या यात्रा -जत्रा आहेत, त्या गावांमध्ये आवर्जून पॅनल प्रमुख जेवणाचे आवर्तन देत आहेत. पॅनलप्रमुख आपले विरोधक कुठल्या वाडीत, कुठल्या गावात गेले आणि कुठे प्रवास करत आहे, याच्यावर लक्ष ठेवू लागले आहेत. आपले विरोधक कसे वाईट व त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये कसे वाईट काम केले, भ्रष्टाचार केला याची जाहीर बातमी आता ते लोकांमध्ये पेरू लागले आहेत. या पॅनेलप्रमुखांचे प्रमुख हस्तक गोपनीय कामाला लागले असून मिळालेली गोपनीय माहिती रात्री पोहोच करण्याचे काम जबाबदारीने पार पाडत आहेत.
पॅनलप्रमुख दमदार सदस्यांच्या शोधात
जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची निवडणूक जुलै महिन्यामध्ये होत आहे. ग्रामपंचायतीचा कारभार ताब्यात घेण्याची मनीषा असलेल्या गाव कारभार करणाऱ्या पॅनल प्रमुखांची भावी सदस्य शोधण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. त्यातच गावांमधून प्रभागनिहाय आरक्षणही जवळपास निश्चित झाले आहे.
हरकतीची तांत्रिक बाब वगळता वॉर्डनिहाय आरक्षणामध्ये फारसे बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने आरक्षणामध्ये सुमारे 50 टक्के महिला तसेच खुला वर्ग इतर मागावर्गीय समाजातील सदस्य व अनुसूचित जाती जमातीतील सदस्य असल्याने या सर्व वर्गामधून आपल्याला दमदार सदस्य कसे मिळतील, या शोध आता पॅनल प्रमुखांनी सुरू केला आहे.
पारावर रंगतोय गप्पांचा फड पॅनलप्रमुख व संभाव्य उमेदवार नागरिकांना आवर्जून नमस्कार घालत आहेत. पाराच्या कट्ट्यावर व हॉटेलमध्ये मतदारांना आवाज देऊन चहापाणी व नाश्ता करण्यासाठी आग्रह केला जात असल्याने नागरिकांनाही आता निवडणूक जवळ आल्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे पारावर गप्पांचा फड रंगत आहे. याचा अंदाज पॅनलप्रमुख यामधून आपला विरोधक कोण उमेदवार देणार याचा घेत आहेत.
विरोधकांना शह देण्याचे मनसुबे विरोधकांना शह कसा देईल असे दमदार उमेदवार आपल्या पॅनलमध्ये असावेत. यासाठी आतापासूनच पॅनल प्रमुखांनी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे.