पुणे – गुन्ह्यांमध्ये पिस्तूल, कोयता, चाकू, चॉपर अशा घातक शस्त्रांचा वापर होत असतो. तर एनेवेळी वादावादी झाल्यावर रस्त्यावर पडलेला दगड किंवा सिमेंटचा ब्लॉकही वापरला जातो. मात्र अता बिअरच्या बाटलीचा वापरही गुन्हयांमध्ये वाढलेला दिसत आहे. बॉलिवूडमध्ये 80-90 च्या दशकात ज्याप्रमाणे हाणामारीच्या सीनमध्ये बाटल्या फोडून एकमेकांना खुपसल्याचे चित्रण दाखवले जात असे. त्या प्रकारे शहरात काही घटना घडल्या आहेत. यातील बहुतांश घटना दारु पिताना किंवा पिल्यावर वाद उदभवल्याने झाल्या आहेत.
मुंढवा पोलिस ठाण्यात दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये बीअरच्या बाटल्या फोडून त्याच्या टोकदार भागाने एकमेकांना खुपसण्यात आले आहे. फिर्यादी मोन्या उर्फ राहुल पुनेकरी (19,रा.घोरपडीगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार राकेश जॉनी सकट (19,रा.मंगळवार पेठ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी एकमेकांचे मित्र आहेत. ते दारू पित बसलेले असताना आरोपीने फिर्यादीचा मोबाईल मागितला. मात्र त्याने तो दिला नाही म्हणून दोघांमध्ये वाद झाले. यातून त्यांच्यामध्ये झटापट झाली. तेव्हा आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात बीअरची फुटलेली बाटली मारली. यामध्ये फिर्यादी जखमी झाला आहे.
तर राकेश जॉनी सकट याने दिलेल्या फिर्यादीनूसार मोन्या उर्फ राहुल पुनेकरी, राहुल मिश्रा, आणि येवले यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी दारु पित असताना मोन्याने फिर्यादीच्या हातातील घड्याळ मागितले. घड्याळ दिले नाही म्हणून मोन्या व राहुल मिश्रा याने काचेची बाटली फोडून फिर्यादीच्या मानेवर, पाठीवर आणि डाव्या हातावर वार केले. यानंतर राहुल मिश्रा व येवले यांनी फिर्यादीला लाथाबुक्कयांनी, पोटावर, तोंडावर मारहाण करुन जखमी केले.
परफ्युमची विचारणा करत डोक्यात बाटली फोडली
चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली. मंगेश लखन (21,रा.खडकी) याने दिलेल्या फिर्यादीनूसार एका कारमधील तीघांविरुध्द चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दुचाकीवरुन घरी जात असताना त्यांना एका मुलाने आवाज दिल्याने ते थांबले.
संबंधीत मुलगा दारुच्या नशेत त्यांच्याजवळ येऊन परफ्युमची मागणी करुन लागला. फिर्यादीने त्याला दोन्ही हाताने बाजूला ढकलले. याचा राग येऊन त्याने कारमध्ये बसलेल्या दोघा साथीदारांना बोलावून घेतले. त्यापैकी एकाने फिर्यादीच्या पोटात लाथ मारली तर इतर दोघांनी बिअरची बाटली त्याच्या डोक्यात फोडली. याप्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करत आहेत.