वॉशिंग्टन : इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डचा प्रमुख मेजर जनरल कासीम सुलेमानी याच्यासह इराणच्या आणखी एका वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्याची हत्या करण्याची योजना अमेरिकेने आखली होती. मात्र, त्यात यश आले नाही, असे वृत्त वॉशिंग्टन पोस्ट अमेरिकतील प्रख्यात दैनिकाने दिले आहे.
इराणचा लष्करी अधिकारी अब्दूल रझा शहलाई यालाही येमेनमध्ये हवाई हल्ला करून संपवायचे होते. मात्र त्यात यश आले नाही, असे लषकरी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात महटले आहे. सुलेमानीला तीन जानेवारीला इराकची राजधानी बगदादमध्ये हवाई हल्ल्यात मारण्यात आले. या हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिरवा झेंडा दाखवला होता.
सुलेमानीच्या मृत्यूसोबतच शहलाईच्या मृत्यूची घोषणा करायची होती. मात्र, येमेनमधील कारवाई अयशस्वी झाल्याने केवळ सुलेमानीच्या मृत्यूची घोषणा करण्यात आली. येमेनमधील कारवाईची घोषणा वगळण्यात आली, असे या वृत्तात म्हटले आहे.
अमेरिकेच्या गृह विभागाकडून शहलाईवर 50 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सौदी अरेबियाच्या राजदूताचा वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या हत्येचा सुत्रधार तोच होता. इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डला निधीचा पुरवठा त्याच्याकडून केला जात होता. अमेरिकन आणि अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर जगभरात त्याने हल्ले घडवून आणले होते.
दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय असणाऱ्या पेंटॅगॉनच्या प्रवक्त्याने येमेन हा दहशतवाद्याचा सुरक्षित तळ बनला असल्याचे मत व्यक्त केले. मात्र लष्करी कारवाईच्या योजनांबाबत भाष्य करता येत नसल्याचे सांगितले.