समाजकार्याची मशाल

कविता बहल यांचा जन्म 20 सप्टेंबर 1971 साली अहमदनगर येथील श्रीरामपूर येथे झाला. कविता या लहानपणापासूनच जिद्दी आणि होतकरू होत्या. त्यांचे प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण हे श्रीरामपूर येथे केले. शिक्षण घेत असतांना त्यांनी विविध खेळप्रकारात सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांनी कबड्डी, फूटबॉल, गोळाफेक, थाळीफेक, धावणे व अन्य खेळात उल्लेखनीय कामगिरी केली. तर, अहमदनगर जिल्हा सौंदर्य स्पर्धेत दोन वेळेस “ब्युटी क्विन’ हा किताब पटकावला.

मात्र, त्यांना शिक्षण घेऊन डॉक्‍टर व्हायचं स्वप्न होत. मात्र, माहेरची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याने त्यांना डॉक्‍टर होता आले नाही. त्यांच बी.एस. सी पूर्ण झाल्यावर त्यांनी मास्टर ऑफ पर्सनल मेनेजमेंटचे शिक्षण पूर्ण करत असतांना त्यांचा विवाह पिंपरी-चिंचवड येथील योगेश बहल यांच्याशी झाला. यानंतर, सर्वच आयुष्य बदलून गेले. लग्नाआधीच नोकरी करण्यास सासरच्यांनी नकार दिला होता. मुलगा आणि मुलीच्या जन्मानंतर परिस्थिती बदलली. मुले मोठी होऊ लागली तसे त्यांना वेळ मिळू लागला.

फावल्या वेळेत महिलांना एकत्र करून सामाजिक कार्य करायला सुरुवात केली. त्यांचे पती योगेश बहल यांच्या राजकीय कारकिर्दीमुळे त्यांच्याही कामात कविताताई मदत करू लागल्या. हळूहळू जनसंपर्क वाढू लागला. लोकांच्या समस्या जवळून जाणता येऊ लागल्या. खूप काही करावे लागणार असल्याची जाणीव त्यांना होऊ लागली. मग गोर-गरिबांना, गरजू व्यक्तींना कविताताई जमेल तशी मदत करू लागल्या. महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवू लागल्या. संत तुकाराम नगर, वल्लभ नगर परिसरात महिलांना एकत्र करून बचतगट, विविध प्रशिक्षण वर्ग असे उपक्रम त्या आयोजित करीत, तर कधी मनोरंजनाचे मोफत कार्यक्रमही महिलांसाठी त्या घेत. या सामाजिक कार्यामुळे “मिसेस योगेश बहल’ ऐवजी “कविताताई बहल’ अशी त्यांची ओळख वाढू लागली.

कविताताईंना आपल्या गत आयुष्यात जे करायला जमले नाही, तसे इतरांसोबत असे घडू नये याकरीता त्यांनी स्वर्गिय ईश्‍वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू केले. पिंपरी-चिंचवड शहराच्या पर्यावरणासाठी कविताताईंचे मोठे कार्य आहे. त्यांनी अतिशय कल्पकतेने विकसित केलेल्या उद्यानासाठी त्यांना पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दिला जाणारा “उत्कृष्ट उद्यान पुरस्कार’ देण्यात आला.

त्या दरवर्षी पर्यावरणासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड करावी या हेतूने स्व:खर्चाने वृक्ष वाटप करतात. त्यांच्या बीकॅन इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात. त्याबरोबरच गुणवान खेळाडूंना आर्थिक सहाय्य करुन खेळाडूंना घडवले जात आहे. तर, दरवर्षी होतकरु 5 विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्यांच्या शिक्षणासाठी पूर्ण खर्च करतात. तसेच, मोठ्या आजारांनी पीडित रुग्णांना आर्थिक साह्य करुन त्यांना आजारातून बरे करण्यासाठी महिला मंडळाच्या वतीने कविताताई कार्यरत आहेत.

पती योगेश बहल हे राजकारणात सक्रिय असतांनासुद्धा कुठलीच राजकीय महत्वकांक्षा नसल्याचे त्या आवर्जून सांगतात. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर म्हणून कारकीर्द केलेले त्यांचे यजमान योगेशजी देखील समाजातील वंचित घटकांसाठी मोठे काम करतात. याचा कविताताईंना खूप अभिमान आहे. आपण जे समाजासाठी करतो, ते जर लोकांना सांगितले तर, त्याला काही अर्थ नाही. गरजूंना जेव्हा माझ्याकडून मदत होते आणि त्यांचे काम पूर्ण होते, तेव्हा मला समाधान मिळते. माझी इच्छा असतांना सुद्धा मला खेळ खेळता आले नाही. मात्र होतकरु खेळाडूंना कुठेच अडचण येवू नये यासाठी संस्थेकडून मदत केली जात आहे.

पुढील आयुष्यात गोरगरिबांसाठी कार्य करायचे असून, पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती व कार्य वाढवायचे आहे. महिलांनी आपल्या घराला सांभाळून आपल्या मुलांवर चांगले संस्काराव भर द्यावी कारण हेच उद्या देशाचे नागरिक असतात. त्याचबरोबर महिलांनी केवळ पतीच्या आधारावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर उभे रहायला हवे, असे कविताताई म्हणतात.

त्यांच आयुष्य हेच खरंतर अनेकांसाठी एक स्वप्न ठरावं… सगळी सुखं, ऐश्‍वर्य पायाशी लोळण घेत असलेल्या “त्या’ मात्र त्यांच्या लहानपणी पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करीत आहेत… पतीचे राजकारण आणि बांधकाम क्षेत्रातील काम, “त्यांचे’ स्वतःचे समाजकार्य, मुलांचे शिक्षण, अशा सर्व धबडग्यात त्यांच्या लहानपणी त्यांनी पाहिलेली आणि अपूर्ण राहिलेली स्वप्ने त्यांना अस्वस्थ करीत राहिली… त्यामुळेच आता त्या अपूर्ण स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी “त्या’ म्हणजे कविता योगेश बहल सज्ज झाल्या आहेत. खेळाडू होता आले नसल्यामुळे क्रीडा क्षेत्रासाठी, डॉक्‍टर होता आले नाही म्हणून आरोग्य क्षेत्रासाठी आणि काळाची गरज म्हणून पर्यावरण क्षेत्रासाठी त्या “स्व. ईश्‍वरदास बहल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून दाखल घेण्याजोगे काम करीत आहेत…

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.