जवानांच्या कार्याबद्दल कायम आदर ठेवा – अनुराधाताई प्रभुदेसाई

पुणे – अकल्पनीय कर्तव्यभावना आणि उत्स्फूर्त ऊर्जा यांच्या संगमातून कठोर सामाजिक वास्तवाशी भिडणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा हृद्य सन्मान सोहळा बुधवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात रंगला. दैनिक “प्रभात’चा पहिल्या नारी सन्मान 2020 हा सोहळा मोठ्या दिमाखात व थाटात संपन्न झाला.

अनुराधा प्रभुदेसाई यांचा अल्पपरिचय…. 
आपण आपल्या घरात शांतपणे झोप घेऊ शकतो आणि आपल्या दैनंदिन जीवनात कसल्याही अडथळ्याविना आपला जीवनक्रम व्यतीत करू शकतो, कारण आपल्या देशाच्या सीमेवर आपले जवान आपल्या रक्षणासाठी अहोरात्र सज्ज असतात. लष्करामध्ये जाणं, तिथलं कठीण प्रशिक्षण घेणं आणि आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर अंतरावर देशरक्षणासाठी सज्ज राहायचं कठीण काम एखाद्या व्रताप्रमाणे जपणाऱ्या जवानांच्या, जवानांच्या कुटुंबियांच्या आणि विशेषत: शहीद जवानांच्या आप्तजनांना मायेचा आधार देणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई म्हणजे जवानांप्रती समर्पित असलेलं एक व्यक्तिमत्त्व आहे. स्वत: राष्ट्रीयकृत बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन आपल्या “लक्ष्य फाउंडेशन’च्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत जवानांच्या शौर्याच्या आणि धैर्याच्या कहाण्या घेऊन जाणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई यांचं बोलणं सतत ऐकतच राहावंसं वाटतं. त्या सांगत असलेल्या जवानांच्या चित्तथरारक जीवनाच्या कहाण्या ऐकताना आपले डोळे कधी पाणावतात, तेही समजत नाही.

आपल्या जवानांसमवेत आपण सण साजरे करायला जाणं, दिवाळी-दसरा असे उत्सव असताना सार्वजनिक ठिकाणी जवानांच्या स्मरणार्थ पणती पेटवणं, किंवा जवानांच्या शौर्यगाथांविषयी पुस्तकं लिहून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं, जेणेकरून जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करता येऊ शकेल, अशा ध्येयानं प्रेरीत झालेल्या अनुराधा प्रभुदेसाई यांचं कार्य हे अतुलनीय आहे. लष्करी शिस्त, सर्वसामान्यांमधील देशाप्रतीची बेपर्वाई, वेळ न पाळणारे लोक अशा अनेक गोष्टींनी अस्वस्थ होणाऱ्या अनुराधा प्रभुदेसाई यांचं कार्य पाहायला, अनुभवायला त्यांच्या एखाद्या उपक्रमात सहभागी होणं अत्यंत आवश्‍यक आहे.

जवानांच्या कार्याबद्दल कायम आदर ठेवा; सैनिकांच्या “मासी’ अनुराधाताई प्रभुदेसाई यांचा सल्ला
“देशाच्या सरंक्षणासाठी लढणाऱ्या व शहीद झालेल्या जवानांच्या कार्याचा प्रत्येक नागरिकाने कायम आदर ठेवला पाहिजे. जवानांची शक्ती कायम जागृत ठेवली पाहिजे,’ असा सल्ला “सैनिकांच्या मासी’ अशी ओळख असलेल्या अनुराधाताई प्रभुदेसाई यांनी दिला. जवानांच्या बलिदानामुळेच आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवली पाहिजे. त्यांनी केलेल्या त्यागासाठी आपण लायक आहोत का, याचाही प्रत्येकाने विचार करावा, असेही त्यांनी सांगितले आहे. शूरवीर सैनिकांचे कार्य त्यांनी उदाहरणांसह विशद केले. सैनिकांच्या डोळ्यांतला अंगार अनेकदा पाहिला आहे. सैनिकांच्या घरातील स्त्री शक्तीही पाहिली असल्याचे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. समाजातील पोत सुधारण्यासाठी सर्वांनीच साथ द्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.