स्वत:साठी कोणीही जगते, दुसऱ्यासाठी जगा – ठमाताई पवार

पुणे – पुणेकर रसिकांच्या प्रचंड उत्साहात आणि अलोट गर्दीत बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी दैनिक “प्रभात’चा पहिल्या नारी सन्मान 2020 हा सोहळा मोठ्या दिमाखात व थाटात संपन्न झाला. यावेळी ‘नवचैतन्य हास्ययोग’ परिवाराच्या उपाध्यक्षा सुमन काटे यांचा सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सौ. ठमाताई पवार यांचा अल्पपरिचय : प्रवाहाविरुध्द पोहून किनारा गाठणारे विरळच. अशा मोजक्‍या व्यक्तींमध्ये सौ. ठमाताई पवार यांचे नाव अग्रभागी घेता येते. रायगड जिल्ह्यातील एका वनवासी कुटुंबात ठमाताईंचा जन्म झाला. जांभिवली हे संपूर्णच वनवासीबहुल आदिवासी क्षेत्र. सगळीकडे अज्ञान, दारिद्य्र, अंधश्रध्दा आणि व्यसनाधीनतेचे प्राबल्य. घरची अत्यंत गरीबी.

कुटुंबाला हातभार लागावा म्हणून ठमाताई जवळच्या वनवासी कल्याण आश्रमाच्या छात्रावासात भाकरी करण्यासाठी जायच्या. तेथील प्रमुख डॉ. कुंटे व त्यांच्या पत्नीमुळे ठमाताईंची अक्षरओळख झाली. भाकरी करण्याठी घेतलेल्या पिठावरच त्या अक्षरे गिरवू लागल्या. नंतर आजूबाजूच्या वनवासी महिलांनाही त्यांनी ही अक्षरओळख करून दिली.

केवळ एवढे करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी महिलांना बचतीचे महत्त्व समजावून देत बचतीची सवय लावली. त्यांचे बचतगटही स्थापन केले. व्यक्तिगत आजारपणाच्या वेळी आलेला अनुभवही त्यांना बरेच शिकवून गेला. वनवासींचा डॉक्‍टरांपेक्षा भगतावरच विश्‍वास अधिक. मात्र, ठमाताई डॉक्‍टरांकडून घेतलेल्या औषधोपचारांनीच बऱ्या झाल्या.

आजार बरा करण्यासाठी डॉक्‍टरच उपयुक्त असतो भगत नाही, याची जाणीव त्यांनी समाजबांधव आणि भगिनींना करून दिली आणि त्यांच्या जीवनात आणि विचारांत परिवर्तन घडवून आणले. एका वनवासी कुटुंबातील मुलगी ते वनवासी कल्याणच्या माध्यमातून त्याच अशिक्षित समाजासाठी झटणारी व विविध बैठकांसाठी एकटीने प्रवास करणाऱ्या ठमाताईंचा प्रवास अनेक खाचखळग्यांचा, अडचणींचा आणि संघर्षाचा.

मात्र, त्यांनी धीराने प्रत्येक प्रसंगाला तोंड दिले. त्यातून यश मिळवले. त्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारही दिले गेले. संयुक्त राष्ट्र संघटनेनेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. आपण, आपला अशिक्षित अथवा अल्पशिक्षित समाज, विशेषत: अंधश्रध्देच्या भोवऱ्यात अडकलेल्या या समाजातील महिला आपल्या कार्यात मोठ्या प्रमाणात आता सहभागी होत आहेत, याचा ठमाताईंना विशेष आनंद आहे. हा आनंद व यश हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा त्यांना मोठे वाटते. अगदी पद्मश्री असो वा पद्मभूषण.

वनवासी बांधव आणि माता भगिनींच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या ठमाताईंना “प्रभात’ परिवाराच्या हार्दीक शुभेच्छा.

स्वत:साठी कोणीही जगते, दुसऱ्यासाठी जगा; वनवासींच्या उत्थानकर्त्या ठमाताई पवार यांचे आवाहन
“वनवासी समाज भरकटलेला असल्याचे अनेकदा आढळले. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्य करण्याची इच्छा निर्माण झाल्याने त्या दिशेने वाटचाल केली. स्वत:साठी कोणीही जगते. दुसऱ्यासाठी जगले पाहिजे, हे संस्कार झाल्याचा आनंद वाटतो आहे,’ अशा भावना वनवासींच्या उत्थानकर्त्या ठमाताई पवार यांनी व्यक्‍त केल्या. “मी कधीही शाळेची पायरी चढले नाही. मात्र, आता वनवासी समाजातील मुलांच्या शिक्षणांसाठी कार्य सुरू ठेवले आहे. यातूनच राज्यात 18 ठिकाणी वनवासी कल्याण आश्रम सुरू झाले आहेत,’ असे त्यांनी सांगितले. या कार्याची दखल केंद्र शासनाने घेऊन गौरव केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.