राज्यातील पहिला स्वतंत्र महिला वाहतूक विभाग
पुणे – नेहमीच सर्वाधिक वाहनांची वर्दळ आणि त्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे धनी ठरणारा फरासखाना वाहतूक विभाग आता “महिला वाहतूक विभाग’ म्हणून ओळखला जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील फरासखाना वाहतूक विभागाची जबाबदारी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाकडे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत स्वीकारली असून, वरिष्ठांच्या अपेक्षाला पूर्णत: उतरून चांगल्या प्रकारे वाहतुकीचे व्यवस्थापन करू, अशी ग्वाही राज्यातील पहिल्या महिला वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त फरासखाना वाहतूक विभागाच्या धुरा पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम यांनी महिलांच्या खांद्यावर दिली आहे. या वाहतूक विभागाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून स्वाती थोरात काम पाहणार असून, सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक के. बी. म्हस्के यांच्यासह 36 महिलांचे पथक तैनात केले आहे.
शहरातील विविध पेठांसह मोठी मंदिरे, अपुरे आणि अरूंद रस्ते, बहुसंख्य विक्रेते, गर्दीने फुललेल्या बाजारपेठा आणि बेशिस्त वाहनचालक अशा एकनाअनेक अडथळे असणाऱ्या शिवाजी रस्ता हा अधिक वर्दळ असणारा आणि महत्त्वाचा रस्त्याचा समावेश फरासखाना या वाहतूक विभागात होतो. त्यामुळे हा वाहतूक विभाग सर्वांसाठीच औत्सुक्याचा विषय ठरत आहे.
हे आहेत प्रमुख अडथळे
– आगामी काळातील मेट्रोचे काम
– विविध विकासकामे
– अरूंद रस्ते
– अतिक्रमणे
शहराच्या वर्दळी आणि मध्यवर्ती भागाची जबाबदारी महिलांकडे सोपवली आहे. आनंदाप्रमाणेच या भागामध्ये आव्हानेदेखील आहेत. पण महिला चांगल्या रितीने या विभागाची जबाबदारी पार पाडतील, याचा आम्हांला विश्वास आहे. नागरिकांमध्ये देखील स्वयंशिस्त असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महिला पोलीस कर्मचारी चौकांमध्ये असल्याने महिला वाहनचालकांची जबाबदारी वाढते. महिला असून देखील महिला कर्मचाऱ्याने कारवाई केल्याचा बाऊ आता महिलांनी करू नये. बेशिस्त महिलांवर देखील कारवाई होणार आहे. नागरिकांना इच्छितस्थळी सुरळीत, सुरक्षित पोहोचण्याकडे आम्ही नक्कीच प्राधान्य देणार आहोत. मात्र, याबरोबरीने नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– स्वाती थोरात,
प्रभारी पोलीस निरीक्षक, फरासखाना वाहतूक शाखा
महिलांना पोलीस आयुक्तांना चांगली संधी दिली आहे. यामुळे महिला नक्कीच चांगली छाप पाडतील आणि त्यांचा विश्वास सार्थ करतील. फरासखाना हा महत्त्वाचा विभाग असल्याने जबाबदारी अधिक आहे. परंतु, आम्ही ती योग्य रितीने पूर्ण करू. अधिकाधिक चांगले काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– संगीता खवळे, पोलीस हवालदार, फरासखाना वाहतूक शाखा