पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल पावणे दोन वर्ष बंद असलेल्या पुणे महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा आता सुरु करण्यात येणार आहे. या शाळांची घंटा गुरुवारी (दि.16) वाजणार आहे.
राज्य शासनाकडून करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 4 ऑक्टोबरपासून शहरी भागातील आठवी ते बारावी व ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1 डिसेंबरपासून शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील पहिली ते चौथीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. त्याबाबत मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या होत्या.
दरम्यान करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटने राज्यात शिरकाव केल्याचे आढळून आल्याने राज्यातील बहुसंख्य स्थानिक प्रशासनांनी शाळा सुरु न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात पुण्यातील शहरी व ग्रामीण शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान करोना प्रादुर्भावाचा आढावा घेऊन पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा 6 डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या होत्या. यानंतर शहरी भागातील शाळा कधी सुरु होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची संयुक्त चर्चा झाल्यानंतर पुणे महापालिका हद्दीतील शाळा सुरु करण्यावर एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.
“पुणे महापालिका हद्दीतील पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यात येणार आहे. शाळा करत असताना करोना प्रतिबंधात्नक सर्व उपाययोजना व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावेच लागणार आहे. शाळांचे र्निजंतुकीकरण करुन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन सर्व व्यवस्था, यंत्रणा सज्ज ठेवून शाळा सुरु कराव्या लागणार आहेत.” – (मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे)