मुंबई – लॉक डाऊनमधून वाहन उद्योग पुरेसा सावरला नसतानाच नोव्हेंबर महिन्यात प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत म्हणजे कंपन्यांनी वितरकांना केलेल्या वाहन पुरवठयात तब्बल 19 टक्क्यांची घट झाली आहे. वाहन उत्पादकाच्या संघटनेने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स आधारित इतर कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्यामुळे वाहन उद्योगासमोरील प्रश्न गंभीर होत चालला आहे. सेमीकंडक्टरवर आधारित इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा पुरवठा होत नसल्यामुळे ग्राहकांना आवडत असलेल्या वाहनांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
नोव्हेंबर 2021 मध्ये वितरकांनी कंपन्यांनी 2 लाख 16 हजार 626 वाहने विकली. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ही संख्या 2 लाख 64 हजार 898 इतकी होती. दुचाकीच्या पुरवठ्यात 34 टक्क्यांची घट झाली आहे. या वर्षी नोव्हेंबरमध्ये 10 लाख 50 हजार 616 दुचाकी विकल्या गेल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 लाख 379 इतक्या दुचाकी विकल्या गेल्या होत्या. स्कूटरच्या विक्रीवर असाच परिणाम झाला आहे. नोव्हेंबरमध्ये तीन चाकी वाहनांची विक्री सात टक्क्यांनी कमी होऊन 22,471 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये 24,071 इतकी तीन चाकी वाहने विकली गेली होती.
नोव्हेंबर महिन्यामध्ये एकूण वाहन विक्री 12 लाख 88 हजार 759 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये ही विक्री 18 लाख 79 हजार 348 इतकी झाली होती. भारतातील प्रवासी वाहन निर्मिती क्षेत्रात मारुती सुझुकी पहिल्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर महिन्यांमध्ये या कंपनीची 1 लाख 9 हजार 726 वाहने विकली गेली. गेल्या वर्षी करोना असून या कंपनीची 1 लाख 35 हजार 775 वाहने विकली गेली होती.
वाहन उत्पादकाच्या संघटनेचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की, करोना व्हायरसमुळे निर्माण झालेला परिणाम दिवाळी दसऱ्यात कमी होईल असे वाहन उत्पादकांना आणि वितरकांना वाटले होते. परंतु सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे या काळातही वाहन विक्री होऊ शकली नाही. नोव्हेंबर महिन्यामध्ये प्रवासी वाहन विक्री सात वर्षाच्या नीचांकावर, दुचाकी वाहनांची विक्री 11 वर्षाच्या नीचांकावर, तीन चाकी वाहनांची विक्री 19 वर्षाच्या नीचांकावर गेली आहे.