सातारा – सातारकरांनी यंदाचा गणेशोत्सव धडाक्यात साजरा करत भक्ती परंपरा कायम ठेवली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात भव्य मूर्तींसोबत सामाजिक प्रबोधन करणारे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. फुटका तलाव येथील गणेशोत्सव मंडळाने जिवंत देखाव्यातून सादर केलेला कारगिल युद्धाचा थरार गणेशभक्तांच्या पसंतीला उतरला आहे.
शहरातील मंडळांकडून गेल्या अनेक वर्षापासून उत्सव काळात स्त्रीभ्रूणहत्या, पर्यावरण संतुलन, आषाढी वारी असे विविध सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखावे सादर करण्याची परंपरा आहे. त्यातही काही मंडळांनी वेगळ्या देखाव्यांची परंपरा आजही कायम ठेवली आहे. येथील फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाने जिवंत देखाव्यातून कारगिल युद्ध प्रसंग मांडला आहे.
सात ते आठ मिनिटांचा कारगिल युद्धाचा थरार अंगावर रोमांच उभा करतो. पोवई नाका येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा चांद्रयान स्वारीचा देखावा सातारकरांची गर्दी खेचत आहे. साताऱ्यातील बाल गणेशोत्सव मंडळाचा हिरकणी देखावाही लक्षवेधी ठरत आहे. यासाठी 30 फूट उंच बुरूज तयार करण्यात आला आहे. यातील कलाकार हा जिवंत देखावा अप्रतिमपणे सादर करत आहेत.
मारवाडी भुवन गणेश मंडळाने सामाजिक जिवंत देखावा सादर केला आहे. सोमवार पेठेतील गजराज गणेशोत्सव मंडळाने लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा काय उद्देश होता तो सफल झाला आहे का हे दाखवण्याचा प्रयत्न देखाव्यातून केला आहे. येथील पंताचा गोट परिसरातील नवयुवक गणेश मंडळाची चतु:हस्त असलेली गणपती मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. रणशूर गणेश मंडळात मल्हार पेठ येथील सिंहासनावर आरुढ झालेला गणराया तसेच शुक्रवार पेठेतील तालीम गणेशोत्सव मंडळाचा फेटाधारी गणपती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.