लोणी काळभोरमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात गणरायाला निरोप
लोणी काळभोर – येथील पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेल्या गणरायाला लोणी काळभोर पोलिसांसह पूर्व हवेलीतील नागरिकांनी आज सातव्या दिवशी ढोल ताशा, लेझीमसारख्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गुलाल न वापरता फुलांच्या वर्षावात मोठ्या उत्साहात निरोप दिला. लोणी काळभोर पोलिसांनी एक आदर्श विसर्जन मिरवणूक काढली होती. अशी विसर्जन मिरवणूक हवेली तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच निघाली असेल, अशी चर्चा दिवसभर लोणी काळभोर परिसरातील नागरिकांच्या मध्ये सुरू होती.
आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्या नंतर विसर्जन मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. दत्तमंदिर, खोकलाई देवी चौक, गणपती मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, पाषाणकर बाग, साधना बॅंक, सोलापूर महामार्ग व एमआयटी या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली.
शेजारच्या मुळा-मुठा नदीत गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्व हवेली तालुक्यातील सर्व गावातील राजकीय पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. महिला पोलीस व महिला पोलीस पाटलांनी गणरायाच्या समोर फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला.
या मिरवणुकीत आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथील अर्जुनाई वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने गणपती बाप्पांच्या समोर पारंपारिक पद्धतीने हरिपाठ म्हणत ‘ग्यानबा तुकारामच्या चालीवर पदन्यास करत सर्वांचे लक्ष वेधले. लोणी काळभोर गावातील कन्या शाळेतील मुलींनी लेझीम खेळत मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी सोरतापवाडी येथील आरंभ ढोल ताशा पथक व लोणी काळभोर येथील बाबा नाशिक बाजा ढोल ताशा पथक यांनी वाजत गाजत मिरवणुकीला सुरुवात केली. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी टाळ, मृदंग व ढोलकी वाजवून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार, शिवशांत खोसे, उपनिरीक्षक किरण धायगुडे, अमित गोरे, विष्णू देशमुख, सदाशिव गायकवाड, सर्व अंमलदार व महिला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिरवणुकीत सहभागी झालेले लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक यांच्यापासुन ते पोलीस अंमलदार, पोलीस शिपाई यांचा एकाच ड्रेसकोड होता. त्यामुळे कोण पोलीस अधिकारी व कोण पोलीस कर्मचारी हे ओळखू येत नव्हते. या ड्रेसकोडमध्ये प्रत्येकाने फेटा, कुर्ता, पायजमा, तर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने साडी परिधान केली होती. हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.