संयुक्त राष्ट्राच्या अहवालात व्यक्त केला धोका
संयुक्त राष्ट्र – अफगाणिस्तानमध्ये तालिबान, अल कायदा आणि तेहरिक ए तालिबान पाकिस्तानदरम्यानचे सख्य स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळे तेथे दहशतवादी गट मुक्तपणे संचार करायला लागले आहेत. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा दहशतवाद वाढण्याची शक्यता त्यामुळेच बळावली आहे, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्राच्या तालिबानबाबतच्या निर्बंध समितीच्या आढाव्याच्या 14 व्या अहवालामध्ये हा धोका व्यक्त करण्यात आला आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता ताब्यात घेताना अफगाणिस्तानच्या भूमीचा कोणत्याही देशाविरोधात दहशतवादासाठी वापर करू दिला जाणार नाही, असे म्हटले होते. मात्र प्रत्यक्ष्यात तालिबानने तेहरिक ए तालिबान पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा दिला आहे, असे या अहवालामध्ये म्हटले आहे.
इसिसके आणि लोवांटृखोरसान प्रोव्हिन्स यासारख्या दहशतवादी संघटनांविरोधातील कारवाईसाठी तालिबानने अनेक देशांची मदत घेतली आहे. हे गट तालिबानचे मुख्य प्रतिस्पर्धी गट असल्याचे मानले जाते आहे. पण तरीही तालिबानचे अनेक दहशतवादी संघटनांशी चांगले संबंध आहेत.
अल कायदा आणि तेहरिक ए तालिबान पाकिस्तानचे तालिबानबरोबरचे संबंध उघड आहेत. हे गट तालिबानच्या छत्रछायेखाली मुक्त संचार करत आहेत. जरी तालिबानने इसिसविरोधात कारवाई केली असली तरी अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी संयुक्त राष्ट्र आणि अमेरिकेबरोबरच्या करारांतर्गत तालिबानने दहशतवाद विरोधी उपाययोजनांतर्गत कारवाई केलेली नाही.
अफगाणिस्तान सीमेवर हिंसाचाराचा धोका…
अल कायदा हळूहळू सबळ होते आहे. तालिबानच्याच मदतीने “टीटीपी’ पाकिस्तानमध्ये हल्ले करत आहे. या संघटनेतील परदेशी दहशतवादी अफगाम-पाक सीमेवर धोका निर्माण करत आहेत. त्यामुळेच इसिस-के सारख्या संघटना अत्याधुनिक बनत चालल्या आहेत. “टीटीपी’ आणि “इसिल-के’ यांच्यात वैचारिक भिन्नता आहे. हाच आता तालिबानसाठी अफगाणिस्तानच्या सीमेवरील मुख्य धोका आहे. “टीटीपी’ला तालिबानने सतत पाठिंबा दिल्याने पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा होण्याची शक्यता आहे आणि सीमेच्या दोन्ही बाजूंनी वाढलेला हिंसाचार पुन्हा वाढण्याचा धोका आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.