पॅरिस – फ्रान्समध्येही करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी मर्यादित लॉकडाउनची घोषणा केली आहे. गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीनंतर पंतप्रधानांनी पॅरिससहीत देशातील सोळा ठिकाणी एका महिन्यांच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे.
हा लॉकडाउन शुक्रवारी मध्यरात्रीपासून चार आठवड्यांसाठी लागू होणार आहे. नवीन लॉकडाउनमध्ये मार्च आणि नोव्हेंबरमधील आधीच्या लॉकडाउनसारखे कठोर निर्बंध नसतील. शाळा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या दुकानांना सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण या लॉकडाउनमुळे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकांना या लॉकडाउनमध्ये घराबाहेर पडता येणार आहे. पण मित्रांच्या घरी जाऊन पार्टी करणे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क न घालण्यासाठी हा लॉकडाउन लागू करण्यात आलेला नाही हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी नियम न पाळणाऱ्यांचे कान टोचले आहेत. नवीन नियमांनुसार जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम पर्याय निवडावा, असे सांगण्यात आले आहे. तसेच परवानगी पत्र असेल तरच लोकांना घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी आणि व्यायाम करण्याची परवानगी दिली जाईल. कोणालाही आपल्या घरापासून दहा किमीपेक्षा जास्त दूर जाता येणार नाही. रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे.
फ्रान्समधील शाळा आणि विद्यापीठे या लॉकडाउनदरम्यान सुरु राहणार आहेत. तसेच सर्व अत्यावश्यक सेवा तसेच पुस्तके आणि संगीताशी संबंधित दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी मंगळवारी बोलताना कॅस्टेक्स यांनी एका प्रकारे ही तिसरी लाट असून तिने देशात प्रवेश केला असल्याचे म्हटले होते. त्यांनी पुढे बोलताना या तिसऱ्या लाटेनेही देशावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडला असून संसर्ग झालेल्यांची संख्या वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.