पुणे – राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पुण्यातही करोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. गेल्या 24 तासात पुण्यात तब्बल 2 हजार 834 करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात पुणे शहरातील 15 तर पुण्याबाहेरील 13 जणांचा म्हणजे एकूण 28 जणांचा पुण्यात करोनामुळे मृत्यू झाला आहे.
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे रुग्णवाढीपेक्षा खुप कमी असल्याचे दिसते. आज दिवसभरात 808 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. शहरातील एकूण करोनाबाधितांची संख्य़ा वाढून आता 2 लाख 29 हजार 383 वर जाऊन पोहोचली आहे. समाधानाची बाब म्हणजे, आतापर्यंत 2 लाख 5 हजार 478 रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतलेत.
पुण्यात आतापर्यंत 5 हजार 17 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 18 हजार 888 करोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी, 499 रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आज दिवसभरात 12 हजार 625 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 2 हजार 834 जणांचा करोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे याबाबत सरकारकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे.