मस्टरवर सही करून शिक्षक उचलतात पगार

विद्यार्थी शाळेत आणि शिक्षक कार्यालयात

पुणे – जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये अपुऱ्या शिक्षकांच्या नावाने दररोज “शिमगा’ केला जातो. मात्र, प्रत्यक्षात मागील काही महिने, वर्षांपासून अनेक शिक्षकांना पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात कर्मचारी म्हणून नेमणूक दिली आहे. त्यामुळे “विद्यार्थी शाळेत आणि शिक्षक कार्यालयात’ अशी परिस्थिती झाली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे हे शिक्षक शाळेच्या मस्टरवर सही करून पगार घेत असले तरी प्रत्यक्षात वर्षानुवर्ष पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या विभागांमध्ये काम करत असल्याचे उघड झाले आहे.

हवेली तालुक्‍यामध्ये शिक्षकांना कर्मचाऱ्यांची कामे दिली आहेत. काही शिक्षक तर, गेली 10 ते 12 वर्षे कर्मचारी म्हणूनच काम करत आहेत. शिरूर तसेच जुन्नर आणि जिल्हा परिषद मुख्यालयातील शिक्षण विभाग विभागांमध्ये हे शिक्षक काम करत आहेत. हवेली तालुक्‍यामध्ये शिक्षक म्हणून नेमणुकीस असणारे शिक्षक गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात काम करतात. या संदर्भात तक्रारी असूनही गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जाते. हवेली शिक्षण विभागामध्ये अनेक वादग्रस्त प्रकरणे असूनदेखील अशा शिक्षकांना शाळांवरून कार्यमुक्‍त केलेले नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांच्याशी चर्चा केली असता, शिक्षकांना कर्मचारी म्हणून काम देणे ही गंभीर बाब असून, अशाप्रकारे शिक्षक पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मुख्यालयात कार्यरत असतील तर त्यांचा केंद्रप्रमुख आणि गटशिक्षण अधिकाऱ्याकडून तत्काळ आढावा घ्यावा. या शिक्षकांची माहिती त्यांनी दिली नाही तर गटशिक्षणाधिकारी यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.