मुंबई विमानतळावरून पुण्यासाठी एसटीची सेवा

पुणे – मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ येथून पुणे व दापोली या ठिकाणी जाण्यासाठी वातानुकूलित शिवनेरी व शिवशाही एसटी बससेवा 16 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यामुळे मुंबईतून पुणे व दापोलीला जाणाऱ्या प्रवाशांना थेट बससेवा मिळणार असल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

जगभरातून मुंबईमधील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र, विमानतळावरून पुणे व कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानक व शहरातील इतर बस स्थानकांवर जाण्याशिवाय पर्याय नसतो. परिणामी, प्रवाशांचा वेळ व पैसा दोन्ही खर्च होतो. यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी वातानुकूलित सेवा पुरविण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या बससेवेमुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.

पुण्यासाठी 17 तर, दापोलीसाठी 3 फेऱ्या

बोरिवली-स्वारगेट (सांताक्रुझ टर्मिनल 1) या मार्गावर शिवनेरीच्या 17 फेऱ्या व बोरिवली ते दापोली या मार्गावर शिवशाहीच्या 3 फेऱ्या सुरू होणार आहेत. तसेच, प्रवाशांच्या माहितीसाठी सांताक्रुझ येथील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ टर्मिनल या ठिकाणी बसचे वेळापत्रक व माहितीचा फलक लावण्यात आला आहे. याचबरोबर, प्रवाशांना माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी 2 सत्रामध्ये वाहतूक नियंत्रकांची नेमणूक केली असल्याची माहिती एसटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.