नॉटिंगहॅम: डेव्हिड वॉर्नर, ऍरोन फिंच, उस्मान ख्वाजा आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी केलेल्या तडाखेबाज खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 381 धावांची मजल मारत बांगलादेशसमोर विजयासाठी 382 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सावध सुरूवात केली. यावेळी डेव्हिड वॉर्नर आणि ऍरोन फिंचयांनी पहिल्या चेंडू पासुन सावध खेळी करत भागिदारी करण्यावर भर दिला. त्यामुळे सुरूवातीच्या काही षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ 5च्या धावगतीने धावा करत होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 9.3 षटकांत अर्धशतकी मजल मारत सावध सुरूवात नोंदवली. तर, 17 व्या षटकांत संघाला शतकी मजल ओलांडून दिली.
यावेळी वॉर्नरनेही 55 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पुर्ण केले. तर, दुसऱ्याबाजुने खेळनाऱ्या फिंचनेही 47 चेंडूत आर्धशतक पुर्ण केले.
हे दोघेही ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारुन देणार असे वाटत असतानाच सौम्य सरकारने फिंचला बाद करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. यावेळी फिंचने 53 धावांची खेळी केली. यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजाला हाताशी धरत वॉर्नरने डावाची सर्वसुत्रे आपल्या हाती घेतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या धावसंख़्येकडे वाटचाल करु लागला. या दोघांनीही सावध खेळी करत 27.2 षटकांत ऑस्ट्रेलिया 150 धावांची मजल मारुन दिली. तर, 34.3 षटकांत संघाला 200 धावा करुन दिल्या.
दरम्यान सावध फलंदाजी करणाऱ्या वॉर्नरने 110 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने आपल्या कारकिर्दीतील 16वे शतक पुर्ण केले. दरम्यान शतकानंतर वॉर्नरने आपल्या फलंदाजीचा गेअर बदलत फटकेबाजीला सुरूवात करत 40 षटकांत 250 तर 43.3 षटकांत 300 धावांची मजल ओलांडून दिली. यावेळी वॉर्नर आपले पहिले द्विशतक झळकावेल असे वाटत असतानाच सौम्य सरकारने त्याला बाद करत ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का दिला. यावेळी वॉर्नरने 147 चेंडूत 14 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 166 धावांची तडाखेबाज खेळी केली. बाद होण्यापुर्वी त्याने ख्वाजाच्या साथीत 23.3 षटकांत 192 धावांची भागिदारी नोंदवली.
वॉर्नर बाद झाल्यानंतर आलेल्या मॅक्सवेलने फटकेबाजी करत 10 चेंडूत 32 धावांची तडाखेबाज खेळी करत ऑस्ट्रेलियाला 350 धावांची मजल ओलांडून दिली. मात्र, सौम्य सरकारच्या षटकात चोरटी धाव घेण्याच्या नादात तो बाद झाला. तर, त्याच षटकांत उस्मान ख्वाजा देखील 89 धावांची खेळी करुन परतला. यानंतर ऍलेक्स केरी आणि मार्कस स्टोइनिसने ऑस्ट्रेलियाला 381 धावांची मजल मरुन दिली.
संक्षिप्त धावफलक – ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 5 बाद 381 (डेव्हिड वॉर्नर 166, उस्मान ख्वाजा 89, ऍरोन फिंच 53, ग्लेन मॅक्सवेल 32, सौम्य सरकार 3-58, मुस्तफिझुर रेहमान 1-69).