नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणऱ्या निर्भया सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना उद्या सकाळी पाच वाजता फाशी देणार असल्याचे निश्चित झाले. निर्भयावर बलात्कार झाला त्यावेळी आपण दिल्लीतच नव्हतो, असा दावा करणारी या प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. दोषींनी न्याय मिळवण्याच्या सर्व सोपस्कार पार पाडले आहेत. त्यामुळे आता या याचिकेला किंमत देता येणार नाही, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
मुकेशचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर न्या. आर भानुमती, अशोक भूषण आणि ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. खंडपीठाने मुकेशच्या दाव्यात कोणतेही तथ्य दिसत नसल्याचे स्पष्ट केले. आरोपीच्या वैद्यकीय दर्जाचा विचार केला नाही, हा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला. त्याचबरोबर कारोली येथून त्याला अटक केल्याबद्दल संशय व्यक्त केला. मात्र, खंडपीठाने स्पष्ट केले की, याचिकाकर्त्यांना त्यांचे सर्व मुद्दे मांडण्याची संधी दिली गेली आहे. ते ऐकूनही घेतले आहेत. त्यांनी फौजदारी अपीलही विस्ताराने ऐकून घेतले आहे. आरोपीने मांडलेल्या सर्व मुद्यांचा विचार केला आहे. हे अपिल खारीज करत आहोत. फेरविचार याचिकेवर विचार केला व ती फेटाळली. ही इन्स्टंट याचिका फेटाळली आहे.
या याचिकेमध्ये कॉल रेकॉर्डींग, सीबीआय सारख्या संस्थेकडील तपासाचा तपशील मागवण्यात आला. शेवटच्या मिनिटापर्यंत कोणत्याही न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय राखून ठेवला असतो. या प्रकरणात केलेला तपास हा बनाव होता, तो एक फसवेगिरीचा कट होता असे आरोप या याचिकेत करण्यात आले होते.