शिक्रापूर – करोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर गाव पूर्ण बंद ठेवत सर्व व्यावसाय व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय 800 व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. तसेच गावातील यात्रा, ÷उत्सव देखील रद्द करण्यात आली असून गावातील मुस्लीमबांधवांनी शुक्रवारची नमाज देखील रद्द केली आहे.
शिक्रापूर येथे करोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रभारी सरपंच भगवान वाबळे, माजी आदर्श सरपंच रामराव सासवडे, व्यापारी असोशियनचे अध्यक्ष अशोक शहाणे, ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे, लद्धाराम पटेल, शिराजभाई शेख, संजय भांबुर्डेकर, किरण पुंडे, पप्पू पाबळे, प्रशांत सासवडे, दिलीप कोठावळे, निवृत्ती काळोखे, मंगेश विरोळे, भगवान पडवळ, सुरेश भुजबळ, रमेश गडदे, विजय लोखंडे, नाना चातुर, राजेंद्र मांढरे, भरत गवारे, गणेश काशीद, लाला गदादे यांसह आदी व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीत गावातील सर्व व्यवहार तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये जीवनावश्यक अशा हॉस्पिटल, मेडिकल यांना पूर्णपणे सूट देण्यात आली. तसेच किराणा दुकान, दूध डेअरी व भाजीपाला दुकाने फक्त सकाळी तीन तास उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. गावातील रविवारचा बाजार तसेच दररोज भरला जाणारा भाजीपाला बाजार पूर्णपणे बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील सर्व मंदिरे तसेच यात्रेतील सप्ताह सुद्धा बंद ठेवण्यात आले आहे. तर, गावामध्ये दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकान दारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मेडिकलमध्ये विकले जाणारे मास्क, सॅनिटायझर जादा कि मतीत विक्री न करण्याचा सूचना देखील मेडिकल व्यावसायिकांना देण्यात येणार आल्याचा आहेत.
- शुक्रवारचा नमाज रद्द
दर शुक्रवारी मशिदीमध्ये पाचशेहून अधिक मुस्लीमबांधव नमाज पठन साठी येत असतात. ही गर्दी रोखण्यासाठी समाजहिताचा निर्णय म्हणून शुक्रवारची नमाज बंद केली असून मुस्लीम बांधव घरी नमाज पठन करेल, असे यावेळी शिक्रापूर जामा मशिदचे प्रमुख शिराजभाई शेख यांनी सांगितले. - शिक्रापूरची हनुमान यात्रा बंद
शिक्रापूर येथील हनुमान देवाची यात्रा रद्द करण्याचा निर्णय यात्रा कमिटीचे प्रमुख गोरक्ष सासवडे यांनी घेतला आहे.
मंदिरात कोणताही कार्यक्रम न होता फक्त देवाची विधिवत पूजा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.