नवी दिल्ली : गेली दीड वर्ष मी येथे हेलपाटे मारत आहे. त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पहात आहे आणि तरी मी इथेच आहे. माझ्या मुलीवर अत्याचार झाले आहेत. मला काही हक्क आहेत. त्यामुळे या नराधमांच्या फाशीचे डेथ वॉरंट जारी करा, अशा शब्दात 2012 मध्ये देशभर खळबळ माजवलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातील पिडितेच्या आईने आज न्यायालयात आक्रोश केला. या चारही आरोपींवर नवे डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी केली, त्यावेळी मुलीवर झालेले क्रुर अत्याचार आठवून त्यांना अश्रु आवरले नाहीत.
पवन गुप्ता या आरोपीच्या वडीलांनी माझ्या मुलाचा खटला चालवण्यास कोणताही वकील तयार नाही, असे न्यायालयाला सांगितल्यावर न्यायलयाने त्यांना कायदेशीर मदत देऊ केली. त्यानंतर मात्र निर्भयाच्या आईचा बांध फुटला. गुप्ताला सरकारतर्फे कायदेशीर सहाय्य देण्यास त्याच्या वडीलांनी आक्षेप घेतला. त्यावेळी अतिरिक्त सत्र न्यायधिश धर्मेद्र राणा म्हणाले, त्याला कायद्याचे पालन करावेच लागेल. कोणताही आरोपी त्याचा शेवटचा श्वास घेईपर्यंत कायदेशीर मदत घेण्यास बांधील आहे.
गुप्ता यांना वकील निश्चित करण्याचा निर्णय घेऊन ही सुनावणी गुरूवारपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर निर्भयाची आई संतापाने न्यायलयाच्या बाहेर पडली. दरम्यान सरकारी वकील इरफान अहमद, ऍमिकस कुरीआ आणि वृंदा ग्रोव्हर यांनी दरम्यान डेथ वॉरंट काढता येऊ शकेल अशी भूमिका मांडली. कारण कोणताही खटला न्यायलयात प्रलंबीत नाही असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायलयात याबाबतची सुनावणी घेण्यास परवानगी दिल्यानंतर तसा अर्ज दाखल करण्यात आला.