कोरेगाव – महान दातृत्व असलेल्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या डी. पी. भोसले कॉलेजमध्ये 70 टक्के मुली शिक्षण घेत असल्याचे ऐकून आनंद झाला. या मुली कोरेगावचे नाव जगात उज्वल करतील,. त्यांनी उज्वल भविष्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन रयतचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.
येथील डी. पी. भोसले महाविद्यालयाच्या मुख्य इमारत व सायन्स विभागाची इमारत आणि डॉ. पतंगराव कदम सभागृहाचे नामकरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी खा. श्रीनिवास पाटील, चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य रामशेठ ठाकूर, मध्य विभाग सल्लागार समितीचे चेअरमन संजू पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. शरद पवार पुढे म्हणाले, कर्मवीर अण्णांनी रयतची स्थापना सर्वसामान्यांच्या सहकार्यातून करून सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षणाची दारे खुली करून दिली. आज चार लाख विद्यार्थी संख्या असणारी अनेक विद्यालये, महाविद्यालये चालवणारी संस्था म्हणून रयतचे नाव घेतले जाते. कर्मवीर अण्णांच्या नंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांची साथ मिळाल्याने संस्थेचा विस्तार मोठा झाला आहे. परदेशात सैन्य दलामध्ये महिलांचा समावेश आहे. त्या धर्तीवर मी संरक्षण मंत्री असताना तिन्ही दलामध्ये महिलांसाठी अकरा टक्के महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतला त्याचा परिणाम म्हणून आज लढाऊ विमानाचे नेतृत्व करतानाच देशाची सीमा रेषा महिला यशस्वीपणे सांभाळत आहेत.
बदलत्या परिस्थितीनुरूप रयतने ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी करार केला आहे. ही युनिव्हर्सिटी आपल्या प्राध्यापकांना ऑनलाइन ट्रेनिंग देईल. याशिवाय मायक्रोसॉफ्ट आणि आयव्हीएम कंपनीशी करार केला. जाणार आहे आयव्हीएम कंपनी आपल्या प्राध्यापकांना आणि मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण ऑनलाइन देईल. कोर्स पूर्ण झाल्यानंतर 86 टक्के विद्यार्थ्यांना नोकरी सदर कंपनी देणार आहे. सदर नोकऱ्या या जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार असल्याने उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी जगात जाण्याची तयारी ठेवावी, असे सांगून खा. पवार म्हणाले, रयत मध्ये शिक्षण घेतलेल्या रायगडमधील रामशेठ ठाकूर यांना दरवर्षी रयतला देणगी दिल्याशिवाय झोप लागत नाही. कष्टाने मिळवलेल्या पैशांमधून ते दरवर्षी पाच कोटी रुपये देणगी रयतला देतात.
त्यांनी आयुष्यभरासाठी एक आदर्श उभा केला आहे. डॉ. अनिल पाटील म्हणाले, रयतच्या इतिहासामध्ये कोरेगावचे मोठे स्थान आहे. रयतचे बीज कोरेगावात रोवले गेले. कर्मवीर अण्णांचे वडील मामलेदार कार्यालयामध्ये काम करत होते. त्यावेळी अण्णांचा मुक्काम येथेच होता. त्यावेळी त्यांनी कोरेगावात सहकार शेतीचा पहिला प्रयोग केला. त्याच्यानंतर त्यांनी सातारला जाऊन रयतची स्थापना केली. कोरेगावचे कॉलेज हे 1986 साली रयतला जोडले गेले. त्यानंतर पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजची मोठी डेव्हलपमेंट झाली.सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून ए ग्रेड मिळाला, असे सांगून डॉ. पाटील म्हणाले, रयतच्या प्रगतीमध्ये एन. डी. पाटील आणि पतंगराव कदम यांचा मोठा वाटा आहे.
याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. विजय सावंत यांनी प्रस्तावित केले. प्राचार्य विजय सावंत यांनी हवा शुद्ध करण्याचे पेटंट मिळवल्याबद्दल रयतचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य सावंत यांनी पेटंट मधून मिळालेल्या रकमेपैकी पाच लाख रुपये रयतला देणगी दिली. महाविद्यालयाचे इमारतीचे बांधकाम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर योगेश कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास प्रा. संभाजी पाटील यांच्या रयत गीताने सुरुवात झाली. याप्रसंगी सुभाषराव देशमुख, नितीन पाटील, सुनील खत्री, प्रभाकर शहाजी, शहाजी शहाजी, रवींद्र पवार, राजेंद्र फाळके, शिवलिंग मेनकुदळे, शहाजी डोंगरे, बाळासाहेब सोळसकर, शिवाजीराव महाडिक, यांच्यासह पालक माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. सोनटक्के यांनी आभार मानले.