मंचर – अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दुर्गसंर्वधन मोहीम राबविण्यात आली. यासाठी किल्ले नारायणगड येथील परिसर विद्यार्थ्यांनी स्वच्छ केला. किल्ल्यावर आवश्यक असलेली संवर्धनाची गरज व महत्त्व ओळखून या किल्ल्याची दुर्गसंवर्धन मोहिमेसाठी निवड करण्यात आली.
हा किल्ला समुद्रसपाटीपासून 876 मीटर उंचीवर असून, तो गिरीदुर्ग या प्रकारात मोडतो. मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी गडाच्या शिखरावर जाऊन तेथे असलेल्या हस्तामाता देवीच्या मंदिरासमोरील दीपमाळ व त्या भोवतालचा परिसर स्वच्छ केला.
स्वयंसेवकांनी गडावरील असलेली पाण्याची टाकीही आणि जमिनीलगत असलेली नारायण टाकी स्वच्छ केली. गडावरची स्वच्छता आटोपल्यानंतर स्वयंसेवकांनी गडाखाली येऊन गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवी मंदिर, त्यासभोवतालचा परिसर व गडाच्या पायथ्यालगतचीही स्वच्छता केली. मोहिमेचे आयोजन विद्यार्थी समन्वयक योगेश शिंदे, शुभम घोडके आणि रासेयो स्वयंसेवकांनी केले. याकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना प्राचार्य डॉ. अविनाश पंत, रासेयो कार्यक्रम अधिकारी मंगेश पांचाळ,प्राजक्ता पिंपळकर यांनी मार्गदर्शन केले.