नवी दिल्ली – भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे. लष्करात लवकरच 1000 किमीहून अधिक दूरवर मारा करणारे ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्र दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासोबतच प्रलय क्षेपणास्त्र ही सैन्याला मिळणार आहे.
या दोन क्षेपणास्त्रांमुळे लष्कराची लांब पल्ल्याची मारा करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून सैन्याचे सामर्थ्यही वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने दोन संरक्षण सेवांसाठी निर्भय क्षेपणास्त्रांना मंजुरी दिली आहे. त्यापैकी निर्भय क्षेपणास्र सहभागी करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. निर्भय क्षेपणास्त्राच्या माध्यमातून दूरुनच शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करता येणार आहे. ब्राम्होस क्षेपणास्त्रासोबत हे जबरदस्त कॉम्बिनेशन असणार आहे. ब्राम्होस जगातील सर्वात उत्तम क्रूझ क्षेपणास्रापैकी एक आहे. निर्भय क्रूझ क्षेपणास्त्र रॉकेट फोर्सचा भाग आहे.
भारताच्या सीमेवर धोक्याचा सामना करण्यासाठी भारतीय संरक्षण दलाकडून त्याची तयारी केली जात आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दल पारंपरिक भूमिकांमध्ये वापरण्यासाठी सामरिक दलांच्या विद्यमान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या ताफ्यातून निवडण्याची संधी देखील मिळू शकते.
निर्भय क्षेपणास्त्रची वैशिष्ट्य –
निर्भय हे सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे अमेरिकन क्रूझ क्षेपणास्त्र टॉमहॉकसारखे आहे. निर्भयची लांबी 6 मीटर, रुंदी 0.52 मीटर आणि वजन 1500-1600 किलो आहे. त्याच्यासोबत 450 किलो स्फोटके आहेत. ट्रकवर लावलेल्या लाँचरमधून ते उडवले जाऊ शकते. हे मार्गदर्शनासाठी INS/GPS चा वापर करते.