पुणे, दि. 22 – पीएमपीच्या लोकमंगल बॅंकेसमोरील (शिवाजीनगर) बस थांबा खासगी ट्रॅव्हल्स बस चालकांनी अक्षरश: बळकावला आहे. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना रस्त्यावर धावत जाऊन बस मिळवावी लागत आहे. याकडे पोलिसांचा वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
शहरातील जवळपास सर्वच पीएमपी थांब्यांवर रिक्षा चालकांनी कब्जा केला आहे. त्यात आता खासगी बसची भर पडली आहे. त्यामुळे पीएमपी बस स्थानक हे पीएमपीसाठी आहे की रिक्षा-खासगी बससाठी? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिवाजीनगर येथे पीएमपी बस स्थानकावर तर खासगी ट्रॅव्हल्स एजन्ट्सनी ताबा मिळवला आहे. स्थानकावरच तिकीट विक्रीचा स्टॉल लावला जातो. त्यामुळे तेथेच खासगी बस उभ्या राहतात. यामुळे पीएमपी बस उभ्या करण्यासाठी जागा नसल्यामुळे पीएमपी बसचालक रस्त्याच्या मध्येच बस उभ्या करतात. त्यामुळे प्रवाशांची धावपळ होते. शिवाय अपघाताचीही भीती आहे.
एसटी महामंडळाची तक्रारही बेदखल
शहरातील वाकडेवाडी, स्वारगेट, पुणे स्टेशन, संगमवाडी येथून मोठ्या प्रमाणात खासगी बस सुटतात. सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या बस रस्त्यावरच उभ्या असतात. त्यांचा त्रास इतर वाहनांना होतो. अवैध वाहतुकीबाबत एसटी महामंडळाकडून वेळोवेळी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली जाते. पण, यावर कोणतीही कारवाई होत नाही.
मी शिवाजीनगर येथे कामाला आहे. दररोज मी लोकमंगल पीएमपी बस थांब्यावर येतो. येथे खासगी बस उभ्या राहत असल्यामुळे पीएमपी बस आलेली पण लक्षात येत नाही. तसेच बस आली, तरी रस्त्याच्या मधोमध उभी राहते. त्यामुळे बस पकडण्यासाठी रस्त्याच्या मध्ये यावे लागते. – रवी पूजारी, प्रवासी