नवी दिल्ली – भारतात करोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत रूग्णवाढीचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येते आहे. दहाच दिवसांपूर्वी 24 तासांत 1 लाख रूग्णांची भर पडल्यामुळे संपूर्ण देश हबकला असताना आज म्हणजे गेल्या 24 तासांत तब्बल 2 लाख 739 नवे बाधित सापडले आहेत. करोनाच्या प्रादुर्भावाचा हा वेग धडकी भरवणारा आहे.
यापूर्वी जगात केवळ अमेरिकेतच दिवसाला दोन लाख रूग्ण सापडत होते. भारतातही पहिल्या लाटेत अर्थात गेल्या वर्षी रोज नवे रूग्ण सापडण्याचा आकडा जेमतेम लाखापर्यंत पाहोचला होता. मात्र आताच्या लाटेत त्याने दोन लाखांचा टप्पा गाठला आहे. तसेच अमेरिकेत रूग्णसंख्या 1 लाखांवरून दोन लाखांवर जायला 21 दिवस लागले होते. मात्र भारतात दहा दिवसांतच बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे.
अमेरिकेत जानेवारी महिन्यात एकाच दिवसात 3 लाख नवे रूग्ण सापडले होते. भारतातील प्रसाराचा वेग पाहता ही रूग्णसंख्या अर्थात एकाच दिवसांत तीन लाख नवे रूग्ण सापडण्याचा टप्पा येत्या पाचच दिवसांत ओलांडला जाऊ शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.
दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत करोनाने 1 हजार 38 जणांचा मृत्यू झाला आहे. काही राज्यांनी लॉकडाऊन तर काही राज्यांनी विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन ऐवजी संचारबंदी हा शब्द वापरण्यात आला आहे. मात्र तरीही या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला दूरगामी फटका बसणार आहे.