विजय लाड
कोयनानगर – कोयनानगर ता. पाटण येथे आपल्या न्याय्य मागण्यांसाठी ऊन, वारा, थंडीची तमा न करता प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन सुरुच आहे. आंदोलनाच्या दहाव्या दिवशी, जागतिक महिला दिनी या आंदोलनाचा ताबा महिलांनी घेतला. “हटणार नाही, उठणार नाही, असा निर्धार रणरागिणींनी केला.
कोयनानगर येथील छत्रपती शिवाजी मैदानावर धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन दहा दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उतरलेल्या महिलांनी जागतिक महिला दिनी बुधवारी आंदोलनाचा ताबा घेतला. या महिलांनी शासनाविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी जगाबाई कदम, अनुसया कदम, कमल कदम, वासंती विचारे, कृष्णाबाई थोरावडे, लक्ष्मी सुतार, अबिदा मुलाणी,
झायराबी शेख उपस्थित होत्या.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा या आंदोलनास पाठिंबा जाहीर केला. आंदोलनाकांसोबत खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत उभे राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली.
पुनर्वसित गावांना ज्या नागरी सुविधा देय आहेत, त्या लवकरात लवकर देण्यात येतील. पुनर्वसित लोकांच्या शेतीला पाणी देण्याच्या योजनांची माहिती घेऊन, त्यावर उपाययोजना केल्या जातील.
जयंत शिंदे