शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालय रविवारीही उघडे

गैरप्रकाराचा संशय ः यापूर्वीही घडलेल्या घटनांची चौकशी सुरू

शिक्रापूर – येथील ग्रामपंचायत कार्यालयात या पूर्वी सुट्टीच्या तसेच कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त सुरु ठेवून काही अफरातफर झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी असून, त्याबाबत कारवाईची प्रक्रिया सुरु आहे. असे असून सुद्धा आज शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालय उघडे असल्याचे दिसून आले आहे.
शिक्रापूर ही शिरूर तालुक्‍यातील मोठी ग्रामपंचायत आहे. त्या ठिकाणी यापूर्वी कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये काही गैरप्रकार झालेले असून त्याबाबत काही ग्रामपंचायत सदस्यांनीच गटविकास अधिकारी यांचेकडे तक्रार केलेली आहे.

शिक्रापूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिटिंग सभागृह, ग्रामविकास अधिकारी कार्यालय, क्‍लार्क कार्यालय, सरपंच कार्यालय वेगवेगळे असून एका मजल्यावर विविध कार्यक्रम घेण्यासाठी देखील स्वतंत्र मोठे सभागृह आहे; परंतु आज रविवार आणि सुट्टीचा दिवस असताना देखील ग्रामपंचायत कार्यालय उघडे होते. सभागृहदेखील उघडे होते. यावेळी चार ग्रामपंचायत कर्मचारी येथे उपस्थित होते; मात्र ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य नव्हते. ग्रामपंचायत कर्मचारी यांना विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी यांच्या आदेशाने आम्ही कार्यालय उघडले असल्याचे त्यांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयात काही कागदपत्रांचे तसेच दप्तराचे गैरप्रकार झालेले असताना सुट्टीच्या वेळी ग्रामपंचायत कार्यालय व सांस्कृतिक सभागृह उघडले जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. आता रविवारी सुट्टीच्या दिवशी ग्रामविकास अधिकारी यांच्या गैरहजेरीत ग्रामपंचायत कार्यालय उघडले गेल्याने शंका उपस्थित केली जात आहे.

ग्रामपंचायत कायर्त्तलय सुट्टीच्या दिवशी सुरू का होते, याबाबत शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले यांना जाब विचारला जाईल. त्यांनतर पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल.
-विजयसिंह नलावडे, गटविकास अधिकारी शिरूर

गावातील नागरिकांना एक कार्यक्रम घ्यायचा होता. यासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यास कार्यक्रम हॉल उघडून देण्यासाठी सांगितले होते. संपूर्ण ग्रामपंचायत उघडण्यास सांगितलेली नव्हती.
-गुलाब नवले, ग्रामविकास अधिकारी शिक्रापूर

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.