चाकण बाजारभाव : कांद्याची आवक घटूनही भावात घसरण
महाळुंगे इंगळे – खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक घटूनही भावातही घसरण झाली. बटाटा, हिरवी मिरची, कोबी, वांगी, दोडका व दुधी भोपळ्याची प्रचंड आवक झाली. फळभाज्यांच्या बाजारात टोमॅटो, फ्लॉवर, भेंडी व कारल्याची आवक घटली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू व पालक भाजीची आवक घटली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाई बैल व शेळ्यां मेंढ्याच्या संख्येत घट झाली. तर म्हशींच्या संख्येत मोठी वाढ झाली. गेल्या महिन्या भरापासून जनावरांचे भाव स्थिर राहिले आहेत. एकूण उलाढाल 6 कोटी 70 लाख रुपये झाली.
चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक 17 हजार क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 हजार क्विंटलने घटूनही भावात 900 रुपयांची घट झाली. कांद्याचा कमाल भाव 3 हजार रुपयांवरून 2 हजार 100 रुपयांवर स्थिरावला. बटाट्याची एकूण आवक 1 हजार 860 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या ही आवक 460 क्विंटलने वाढल्याने भावात 300 रुपयांची घसरण झाली. जळगाव, भुईमूग शेंगांची एकूण आवक 15 क्विंटल झाली. बटाट्याचा कमाल भाव 1 हजार 800 रुपयांवरून 1 हजार 500 रुपयांवर स्थिरावला. जळगाव भुईमूग शेंगांची आवक 14 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 1 क्विंटलने घटल्याने भावात 900 रुपयांची वाढ झाली.
या शेंगांचा कमाल भाव 11 हजार 100 रुपयांवरून 12 हजार रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक 3 क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक 2 क्विंटलने घटूनही भावात 1 हजार रुपयांची घसरण झाली. लसणाचा कमाल भाव 15 हजार रुपयांवरून 14 हजार रुपयांवर स्थिरावला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक 470 क्विंटल झाली आहे.
जनावरे – चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 45 जर्सी गायींपैकी 30 गायींची विक्री झाली. (10 ते 50 हजार रुपये), 90 बैलांपैकी 65 बैलांची विक्री झाली.(10 ते 35 हजार रुपये), 140 म्हशींपैकी 105 म्हशींची विक्री झाली. (20 ते 60 हजार रुपये), शेळ्या-मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या 7 हजार 880 शेळ्या-मेंढ्यापैकी 6 हजार 990 मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना 1 हजार 200 ते 10 हजार रुपये इतका भाव मिळाला.