संपला हंगाम, तरीही पावसाचा मुक्‍काम

शहरात दिवसभर रिपरिप : राज्यातही विविध भागांत तडाखा
पुणे- मान्सून माघारी गेला तरी अद्याप पावसाचा मुक्‍काम संपत नसल्याचे दिसत आहे. आज पुण्यासह पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने तडाखा दिला. यामुळे वातावरणात बदल झाला असून गारठा वाढला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे दक्षिण भारतासह राज्यात ही पाऊस पडत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे शहरात रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. गेले दोन दिवस शहरातील तापमानात वाढ होत आहे. दिवसा उकाडा आणि संध्याकाळी ढगाळ वातावरण असे चित्र पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली त्यानंतर सकाळी थोडी विश्रांती घेतल्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाने हजेरी लावली. पावसाच्या सरी सारख्याच कोसळत होत्या. संध्याकाळी सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली.

अचानक आलेल्या या पावसाने मात्र नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. त्यातच उमेदवारांनाही आपल्या प्रचाराचा शेवट हा पावसात भिजत करावा लागला. शहरातील रस्त्यावर ठिकाठिकाणी पाणी साचले होते. गेले काही दिवसांपासून पाऊस थांबला असल्याने अनेक ठिकणी खड्डे बुजविण्याची कामे सुद्धा सुरू झाली होती. अचानक आज आलेल्या पावसाने आता पुन्हा खड्डे पडणार असून खड्डे बुजविण्याचे काम सुद्धा काही दिवस लांबणीवर पडणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला.

पुण्याव्यतिरिक्त पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर काही भागात हलक्‍या पावसाच्या सरी कोसळत आहेत.अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील राज्यांच्या किनारपट्टीच्या भागात ढगाचे आवरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच पाऊस पडत आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस राहणार असल्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पाऊस पडणार आहे. पुण्यात (रविवारी)सुद्धा पावसाच्या सरी कोसळणार आहेत तसेच दिवसभर हवामान ढगाळ राहणार आहे.

शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी
पाऊस आणि वाहतूक कोंडी हे आता समीकरणच बनले आहे.आज सुद्धा संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहू लागले होते. त्यामुळे अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.हडपसर, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर कात्रज -कोंढवा रोड तर जड वाहनांमुळे पूर्ण बंद झाला होता. पाऊस आणि रस्त्यावरील खड्डे यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. स्वारगेट चौक, दांडेकर पूल याठिकाणी वाहतूक जॅम झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.