तरुणांनी भाजपची झोप उडवली : पवार  

कर्जत – कर्जत-जामखेडची ओळख दुष्काळी भाग म्हणून होती. एकेकाळी नेहरू-इंदिरा गांधी दुष्काळ पहायला इकडे आले होते. मला विश्वास आहे की तरुणांमुळे एखादा परिसर कसा बदलतो हे पाहण्यासाठी पंतप्रधानांना कर्जत-जामखेडला यावे लागेल.

कर्जत-जामखेडचा निकाल लागलाय. आपलं ठरलंय. पण आता फक्त रोहितला निवडून देऊन चालणार नाही तर, पुढच्या पाच वर्षांत त्याला प्रत्येक कामात साथ दिली पाहिजे. कर्जतच्या तरुणांनी भाजपची झोप उडवली आहे. येत्या 24 तारखेला कर्जत – जामखेडमध्ये भाजपचा ‘राम’ शिल्लक राहणार नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

कर्जत येथील सभेत ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, आम्हाला बारामती बदलायला 50 वर्षे लागली. कर्जत-जामखेड बदलायला पाच ते सात वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार नाही. मुख्यमंत्री एकदा नाही, तीन वेळा कर्जत-जामखेडला आले. ते कायम कुस्तीचा विषय काढतात. कसली कुस्ती खेळायची. कुस्ती खेळायची कुणासोबत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, तुम्ही कुस्तीचा विषय काढला, पण कुस्ती परिषदेचा मी अध्यक्ष आहे असा टोला पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सभेला तरुणांची तुफान गर्दी होती. शरद पवार बोलत असताना कोण आला रे कोण आला? मोदी शाह यांचा बाप आला, अशा घोषणा तरुणांनी दिल्या. पावसामुळे सभास्थळी बसण्यास जागा नव्हती. त्यामुळे लोकांनी उभे राहून सभा ऐकत टाळ्या सुट्टी आरोळ्यांनी प्रतिसाद दिला.

यावेळी रोहित पवार म्हणाले, कुकडी- घोडचा पाणी प्रश्न, युवक- महिलांच्या हाताला काम, दर्जेदार रस्ते, शिक्षणाच्या सुविधा यावर भर देऊन कर्जत जामखेडचा विकास केला जाईल. मतदारसंघातील युवक तसेच जनतेने दाखवलेल्या प्रेमाबद्दल पवार यांनी आभार मानले. महाआघाडीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.