इक्विटेबल मॉर्गेज, सिंपल मॉर्गेजसाठी राजपत्र प्रसिद्ध
दोन्ही मॉर्गेजवर 0.3 टक्के मुद्रांक शुल्क
पुणे – इक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज (साधे गहाणखत) या दोन्हींवर आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी आता एकसारखी आकारण्याचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार या नियमांची बुधवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे दोन्ही प्रकाराच्या गहाणखतासाठी आता 0.3 टक्केच मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.
गहाणखताचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी ईक्विटेबल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज यांचा सर्वाधिक वापर होतो. परंतु त्यासाठी वेगवेगळी स्टॅम्प ड्यूटी भरावी लागते. इक्विटेबल मॉर्गेजसाठी सध्या 0.2 टक्के, तर सिंपल मॉर्गेजसाठी 0.5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते.
अनेकदा त्यामुळे नागरिकांना गोंधळ होतो. त्यातून वारंवार लोकांना सब रजिस्टर कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. तसेच सिंपल मॉर्गेजसाठी पाच लाख रुपयांच्या आत कर्ज असेल, त्यावर 0.1 टक्के आणि त्यावरील रकमेचे कर्ज असेल, तर त्यावर 0.5 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. सिंपल मॉर्गेज करणारा घटक हा प्रमुख्याने असंघटीत क्षेत्रातील असे. त्यामुळे त्यांना जादा स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. त्यामध्ये आता बचत होणार आहे.
दरवर्षी अशा प्रकारचे सुमारे पाच ते सहा लाख गहाणखताचे व्यवहार होतात. यातून सुमारे दोन हजार कोटींचा महसूल राज्य शासनाला मिळतो. या दोन्ही मॉर्गेजमधील गोंधळ दूर करून त्यामध्ये सुटसुटीतपणा आणणे व त्यांचे शुल्क एकसमान करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे, त्यासाठी स्टॅम्प ऍक्टमध्ये दुरुस्ती करून या दोन्ही मॉर्गेजवर 0.3 टक्के मुद्रांक शुल्कच आकारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे.
त्यास राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात होती. मान्यतेनंतर यानियमाची अधिसूचना दि. 9 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबरच नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे उत्पन्न देखील वाढण्यास मदत होणार आहे.