मदतीचा हात : शिव सेवा प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम
लोणावळा – निसर्ग या चक्रीवादळात लोणावळा शहर आणि परिसराला मोठा फटका बसला. मात्र यात सर्वाधिक नुकसान बसले ते लोणावळा-खंडाळा घाटमाथ्यावर बसलेल्या आदिवासी वाड्या वस्त्यांना. राजमाची, नागनाथ, उंबरवाडी ही यापैकीच काही गाव. लोणावळा शहरातील शिव सेवा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गावाला घरांसाठी पत्रे आणि लोखंडी अँगल देऊन आपुलकीचे छत उभारणीस मोलाचा वाटा उचलला आहे.
मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटात वसलेल्या नागनाथ या गावाला तीन जून रोजी आलेल्या निसर्ग या चक्रीवादळाचा चांगलाच तडाखा बसला. वादळामुळे गावातील एकही घरावर छप्पर राहिले नाही. पावसाचा मारा आणि डोक्यावर छप्पर उडालेली उघडी बोडकी घर अशा परिस्थितीत सर्वच्या सर्व कुटुंब एका दिवसात उघड्यावर आली. शासकीय मदत कधी आणि किती पोचेल याची शाश्वती नसल्याने आणि आधीच “लॉकडाऊन’मुळे मेटाकुटीला आलेले आदिवासी ग्रामस्थ हवालदिल झाले होते.
नागनाथ गावाची झालेली दुरवस्था ऐकून लोणावळा शहरातील शिव सेवा प्रतिष्ठान यांनी तातडीने संस्थेच्या सभासदांना मदतीसाठी आवाहन केले. याला सभासदांनी उत्तम प्रतिसाद दिला. जमा झालेल्या रकमेमधून शिव सेवा प्रतिष्ठान संस्थेचे कार्यकर्ते राजेश येवले, आशिष मेहता, गजेंद्र यादव यांनी धावपळ करीत साठ हजार रुपये किमतीचे 150 पत्रे आणि पत्रे बसविण्यासाठी लागणारे खिळे व वायसर आदी सामानाचा ट्रक भरून नागनाथ गावाकडे रवाना केला. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय चंद्रात्रे, अजित घमंडे, सुनील व्हरांबळे, राजेश कामठे यांच्या मार्गदर्शनानुसार नागनाथ येथे पुढील मदातकार्य सुरू आहे.