भाजप इच्छुकांच्या आज मुलाखती ; नवे चेहरे, अन्य पक्षांतील इच्छुकांसाठी वेगळी वेळ
नगर – महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी विद्यमान आमदारांना आशीर्वाद मागताना शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे भाजप स्वबळावर तयारी करीत असल्याची चर्चा असतांना दुसरीकडे युतीमधील जागा वाटपाबाबत दोन्ही पक्ष सकारात्मक असले तरी शिवसेनेनेही आपली सज्जता ठेवल्याचेही समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने सर्वच मतदारसंघात स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. त्यातून उद्या सर्वच मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहे. या मुलाखतीच्या निमित्त्याने विद्यमान आमदारांच्या विरोधात पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उघड होण्याची शक्यता आहे.
भाजपमध्ये अजूनही प्रवेश करण्याची संख्या मोठी आहे. त्यामुुळे उद्या होणाऱ्या विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखतीसाठी अन्य पक्षातील इच्छुक किती येणार याबाबत उत्सुकता आहे. या मुलाखतीच्या निमित्ताने अनेक नवे चेहरे व अन्य पक्षातील इच्छुक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मंडळींसाठी वेगळी वेळ देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या सुत्राकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांशी व्यक्तिगत स्तरावर चर्चा करणार आहेत. या मुलाखती दरम्यान कोणत्याही इच्छुक उमेदवाराने शिष्टमंडळ किंवा शक्तिप्रदर्शन करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघ असून, त्यापैकी पाच मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत. या पाचही मतदारसंघांतील आमदारांना स्पर्धक असले तरी उमेदवारीच्या बाबतीत विद्यमान आमदार सेफ मानले जात आहेत. अर्थात नेवासे व कोपरगावच्या विद्यमान आमदारांबद्दल पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात नकारात्मक बाजू आली आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघाबाबत वेगळा विचार होण्याची शक्यता आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात बढती देण्याचा शब्द दिला आहे. ना. शिंदे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. असे असले तरी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तयार झाला आहे. ना. शिंदे यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी उमेदवारीसाठी गुडघ्याला बांशिन बांधले आहे. पाथर्डी शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी पक्की आहे. पण त्यांना पक्षातून विरोध होत आहे. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे निवडणूक तयारीला लागले असून अन्य पक्षातून माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी भाजपकडे फिल्डिंग लावली आहे.
राहुरीमध्ये आमदार शिवाजीराव कर्डिले हे मात्र अडचणीत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांच्या विरोधात काम केल्याची तक्रार खा. विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अर्थात या तक्रारीची मुुख्यमंत्र्यांनी अजूनही दखल घेतली नाही. असे असले तरी पक्षांतर्गत आ. कर्डिलेंना प्रतिस्पर्धी वाढले आहेत. देवळालीप्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्याबरोबर ही जागा शिवसेनेकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कोपरगाव व नेवासे मतदारसंघातील विद्यमान आमदार अनुक्रमे स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजी असल्याचा अहवाल पक्षाकडे आला आहे. त्यामुळे या मतदारासंघातील अन्य इच्छुकांच्या आशा वाढल्या आहेत.
कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे, राजेश परजणे यांनी तयारी सुरू केली आहे. तर नेवासेमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अर्थात अहवाल असला तरी कोपरगावमधून कोल्हे यांच्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगण्यात येत आहे. शिर्डीमधून गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात सध्या तरी कोणी पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी नाही. अकोलेमध्ये मात्र भाजप नव्याने दाखल झालेल्या आमदार वैभव पिचड यांच्या विरोधात पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी आहेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक भांगरे इच्छुक आहे.
त्याबरोबर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादीकडून निवडणुकीत लढण्याचे संकेत दिले आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची कोंडी करण्यासाठी संगमनेरमधून जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांच्या उमेदवारीचा घाट घातला जात आहे. नगर शहराच्या जागेसाठी भाजपकडून आग्रह होत असून त्यासाठी माजी खासदार दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे इच्छुक आहे. असे असले तरी श्रीगोंद्यातून राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, नगरचे आमदार संग्राम जगताप हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. यासह नव्याने पक्ष प्रवेश करणारे अनेक आहे. त्यापैकी आता कोण उद्या उमेदवारीसाठी येणार हे आता उत्सुकतेचा विषय ठरणार आहे.