नगर – नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील मेहेरबाबा फाट्याजवळ एसटी बसमधून प्रवास करणाऱ्याने वाहकास मारहाण करून दुखापत केली. या मारहाणीत वाहक जखमी झाला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमोल भाऊसाहेब मते (रा. डोंगरगण, ता. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मते हा डोंगरगण येथून एसटीत प्रवास करीत होता. वाहक बाबासाहेब मरकड यांनी त्याला दहा रुपयांचे तिकीट दिले.
मते याने शंभर रुपयांची नोट दिली. सुट्टे पैसे नसल्याने मरकड यांनी प्रवाशाकडे दहा रुपये सुट्टे मागितले. सुट्टे पैसे नव्हते, तर तिकीट कशाला दिले आहे. सुट्टे पैसे ठेवता येत नसेल, तर नोकरी का करतो, असे म्हणून मते याने वाहकास शिवीगाळ, दमदाटी केली. वाहकाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या तोंडावर जोराचा फटका मारून गंभीर दुखापत केली. या फटक्यात वाहक जखमी झाले आहेत.