दावडी/राजगुरूनगर -कनेरसर (ता.खेड) येथील कुलस्वामिनी श्री यमाई देवीच्या मंदिरात खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, सचिव तथा धर्मादाय आयुक्त विभागाच्या निरीक्षक रागिणी खडके यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
यावेळी सुरेखा मोहिते, ऍड. सुखदेव पानसरे, जिल्हा परिसदेचे माजी सदस्य अरुण चांभारे, श्री यमाई देवस्थान ट्रस्ट माजी अध्यक्ष मोहन दौंडकर, सुदाम माशेरे, सरपंच सुनीता केदारी, मयूर मोहिते, कांचन ढमाले, राजू राऊत, खेड न्यायालयाचे विठ्ठल राऊत उपस्थित होते.
दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र गेल्या वर्षी करोनाचे संकट असल्याने भाविकांना देवीचे दर्शन करता आले नाही. करोनामुळे मंदिर बंद होते. मात्र, आज राज्यभरातील मंदिरे दर्शनासाठी उघडल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
शासन नियम, तसेच करोनाविषयक नियम पाळूनच ठरवलेल्या वेळेत व मर्यादित संख्येत मंदिरात प्रवेश करावा. लहान मुले, गर्भवती महिला, वयोवृद्ध नागरिक, तसेच आजारी व्यक्ती यांनी नवरात्र उत्सवादरम्यान मंदिरात प्रवेश टाळावा, तसेच नागरिकांनीही मास्क
सॅनिटायझरचा वापर करून सोशल डिस्टन्सचे पालन करावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष तथा खेड न्यायालयाचे न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी भाविकांना केले आहे. उत्सव काळात मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी खेड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस व होमगार्डचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.