फ्लेमिंगो (रोहित) पक्ष्यांचा परतीचा प्रवास लांबणीवर

उजनी जलाशयावरील मुक्‍काम वाढला

सोलापूर: लाखांच्या घरात यंदा हिवाळी पाहुणे पक्ष्यांनी जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी जलाशयावर विस्तारासाठी येऊन अभूतपूर्व गर्दी केली होती. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे लाखमोलाचे पाहुणे सामान्यपणे मे महिन्यात आपल्या मूळस्थानी परतत असतात. परंतु यंदा थंडी पडण्या अगोदरच हजारोंच्या संख्येने येऊन दाखल झालेले फ्लेमिंगो अद्याप उजनी जलाशयावर मुक्कामाला आहेत. अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयातील रत्नशंकर निसर्ग मंडळाचे कार्याध्यक्ष तथा पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी नुकतेच जलाशय परिसरात भ्रमंती करून ही माहिती दिली.

युरोप व कच्छच्या रणातून हे नजाकतदार पक्षी हिवाळ्यात जिल्ह्यातील उजनीच्या पाणलोट क्षेत्रासह सोलापूर शहरालगतच्या हिप्परगा तलाव, अक्कलकोट तालुक्‍यातील कुरनूर धरण परिसर, मोहोळ तालुक्‍यातील आष्टी तलावात येऊन दाखल झाले होते. या वर्षी पुरेसा पर्जन्यमान झाला नसल्यामुळे उजनी जलाशय वगळता जिल्ह्यातील सर्वच जलस्थाने फेब्रुवारी महिन्यात कोरडेठाक पडले. जिल्ह्यात इतरत्र विखरलेले फ्लेमिंगो मार्च-एप्रिलमध्ये उजनी जलाशयावर एकवटले व अद्याप उजनीच्या पाणलोट क्षेत्रात त्यांचा वावर पाहायला मिळतो. विशेषतः सध्या आढळणाऱ्या फ्लेमिंगोंच्या समूहात त्यांच्या पिल्लांची संख्या लक्षणीय आहे.


लेसर फ्लेमिंगोंची उजनीला भेट ही खास बाब

फ्लेमिंगोमधील लेसर फ्लेमिंगो या प्रकाराचे फ्लेमिंगो उजनीवर येणे तसे दुर्मिळच. मात्र यावर्षी प्रथमच तेही शंभराच्या संख्येने फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात दहा-पंधरा दिवसांच्या मुक्कामासाठी येऊन गेले ही विशेष बाब आहे. जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन व अमाप उपशामुळे सध्या पाणी उणे पंचावन्न टक्‍क्‍यांपर्यंत पोहचले आहे. पाणी पातळी अती वेगाने खालवत चालली आहे. बॅकवॉटर परिसरातील भूभाग उघडा पडला आहे. या ठिकाणी गेल्या महिनाभर चाळीशी पार केलेल्या पाऱ्यात पक्ष्यांना आल्हाददायक वातावरण आहे.


हिवाळ्यात स्थलांतर करून आलेल्या फ्लेमिंगोसह इतर बदके सामान्यपणे एप्रिल महिन्यात आपल्या मूळस्थानी परततात. मात्र यावर्षी हे पक्षी अद्याप मुक्कामाला आहेत. पावसाला प्रारंभ झाला की म्हणजे या आठवड्यात ते ही उड्डाण घेतील, असा अंदाज आहे. पळसदेव परिसरात सध्या फ्लेमिंगोंचा वावर पाहायला मिळत आहे. पाण्यातून मुक्त झालेले मंदिर पाहायला पर्यटकांना हे फ्लेमिंगो आकर्षित करत आहेत.
-प्रा. डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक, अकलूज.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)