Sangli Lok Sabha Election 2024| महाविकास आघाडीत मागील काही दिवसांपासून सांगलीच्या जागा वाटपावरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. अखेर गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला. ज्यानंतर सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली. तरी सांगलीचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी या जागेवर आपला दावा केला. परंतु, पक्षाकडून याबाबत कोणतेही उत्तर न आल्याने सोमवारी (ता. 15 एप्रिल) त्यांनी सांगली लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सांगली लोकसभेतून मविआकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र येथून निवडणूक लढवण्यासाठी विशाल पाटील देखील इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना संधी न मिळाल्याने त्यांनी अखेर अपक्ष उमेदवारी दाखल करत ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली आहे. जागावाटपामध्ये सांगली लोकसभेची जागा मिळावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी फारच आग्रह धरला होता. मात्र उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्याने काँग्रेसला सांगलीच्या जागेवर पाणी सोडावे लागले.
साहजिकच सांगली लोकसभेची जागा शिवसेनेला गेल्याने संतापलेल्या विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. ‘आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि सिद्धनाथाची कृपादृष्टी नेहमीच पाठिशी राहिली आहे. येणारा काळ कसोटीचा असला तरी सोबत संघर्षाचा वारसा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचे असणारे पाठबळ अगणित ऊर्जा देणारे आहे’, असे पाटील यांनी ‘एक्स’ वर म्हटले आहे.
सांगलीत तिरंगी लढत Sangli Lok Sabha Election 2024|
शिवसेना ठाकरे गटाने येथून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील तिसऱ्यांदा लोकसभा लढवत आहेत. विशाल पाटील निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले तर सांगलीत तिरंगी लढत होणार आहे.
संजय पाटील यांचा होणार फायदा? Sangli Lok Sabha Election 2024|
परंतु विशाल पाटील अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरल्याने ठाकरे गटाच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. या मतदारसंघातील विजयाचे गणितही मोठ्या प्रमाणावर बदलू शकते. बंडखोरी होऊन होणाऱ्या मतविभाजनाचा भाजपच्या उमेदवाराला अर्थात संजय पाटील यांना निश्चितच फायदा होऊ शकतो.
हेही वाचा:
पुण्यात फ्लॅट, फॉर्च्यूनर कार …! लोकसभेच्या रिंगणात उतरलेल्या राजू शेट्टींची एकूण संपत्ती किती?