जिल्ह्यात गुरुवारी पावसाची रिपरिप सुरू

सातारा – गत आठवडाभरापासून पावसाचा लपंडाव सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात सकाळी पाऊस तर दुपारी ऊन अशी परिस्थिती असल्याने मान्सूनच्या पावसाबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र, गुरुवारी सकाळपासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह दिवसभर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने शहरासह ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण आहे.

यंदा मान्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांसह सर्वांमध्येच समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र जूनचा पहिला आठवडा गेला, दुसरा आठवडा गेला तरीदेखील पावसाचा थेंबसुद्धा पहायला मिळाला नाही. मान्सून सोडा पण वळीव पावसानेही यंदा पाठ फिरविल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणीसंकट तीव्र झाले होते. जून महिन्याचे दोन आठवडे उलटल्यानंतर दोन दिवस वळीव पावसाने जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावल्याने मान्सूनच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतरही कडक ऊन पडू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. अखेर गुरुवारी दिवसभर सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.