राहुल यांनी प्रियंका यांच्याकडे अध्यक्षपदाची सुत्रे सोपवावीत

कॉंग्रेस नेत्याची मागणी: गांधी परिवाराकडेच नेतृत्व ठेवण्याची भूमिका

हैदराबाद -कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या राहुल गांधी यांचे मन वळवण्यासाठी पक्ष प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. अशातच पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने वेगळी भूमिका मांडली आहे. राहुल यांनी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी-वढेरा यांच्याकडे सुत्रे सोपवावीत, अशी मागणी त्या नेत्याने केली आहे.

तेलंगणमधील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मार्री शशिधर रेड्डी यांनी ती वेगळी भूमिका मांडली आहे. राहुल यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्‍वास आहे. मात्र, नवा अध्यक्ष निवडण्याबाबत त्यांनी व्यक्‍त केलेल्या भावनेचा आदर करायला हवा आणि त्यादृष्टीने लवकर निर्णय घ्यायला हवा. काही राज्यांत लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी कॉंग्रेसला सज्ज व्हावे लागणार आहे, असे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एम.चन्ना रेड्डी यांचे पुत्र असणाऱ्या रेड्डी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.

कॉंग्रेसचे अध्यक्षपद गांधी परिवाराकडेच ठेवण्याची भूमिका रेड्डी यांनी याआधीही मांडली होती. त्याचा पुनरूच्चार करत ते म्हणाले, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होऊन राहुल यांना मोकळी वाट करून दिली. आता प्रियंका हा पर्याय आहे. नेहरू-गांधी परिवारच पक्षाला एकत्र ठेऊ शकतो, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.