भूखंड घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक

विधानसभा दोनदा तहकूब

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील हवेली व बालेवाडी येथील भूखंड घोटाळ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत पाटील यांना गुरुवारी सभागृहात बोलण्यास परवानगी नाकारल्याने विरोधक आक्रमक झाले. जयंत पाटील यांना बोलण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले.

जयंत पाटील यांनी बुधवारी केलेल्या आरोपावर महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत खुलासा केला. त्यावर जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला. बुधवारी मी केलेले आरोप कामकाजातून काढून टाकले आहे, मग त्यावर मंत्री निवेदन कसे काय करू शकतात असा सवाल केला त्यांनी केला. चंद्रकात पाटील यांचे निवेदन कामकाजातून काढून टाका किंवा मी बुधवारी केलेले निवेदन सभागृहाच्या पटलावर घ्या, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. पण सभागृहात मुदतीत कागदपत्रे सादर केली नाही त्यामुळे त्यांचे निवेदन पटलावर घेता येणार नाही असे उपाध्यक्ष विजय औटी यांनी सांगितले.

संसदीय कामकाज मंत्री विनोद तावडे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियमातील तरतुदीचा आधार घेत जयंत पाटील यांचे निवेदन पटलावर घेता येणार नाही, असे सांगितले. तर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सभागृहाच्या बाहेर एखादे भाष्य होते त्यावर मंत्री म्हणून भाष्य करण्याचा अधिकार मंत्र्यांना असतो. त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांनी जयंत पाटील यांचे निवेदन पटलावर घेण्याची मागणी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, यापूर्वीच्या नोंदी तपासा, त्यांनी आरोप करताना नोटीस दिलेली नव्हती. कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असेल तर विरोधकांचा आवाज दाबणार का असा प्रश्न केला. या वेळी विरोधक आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागेल.विरोधकांनी विधानभवनाच्या पायNयांवरही चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली.

Leave A Reply

Your email address will not be published.