नवी दिल्ली – पहिल्या तिमाहीतील राष्ट्रीय उत्पन्न 20.1 टक्क्यांनी वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असतानाच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता पुरेसा वेग घेत नसल्याची परिस्थिती समोर आली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या उत्पादकतेची आकडेवारी बुधवारी जाहीर झाली.
या आकडेवारीनुसार मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा ऑगस्ट महिन्यातील पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स म्हणजे पीएमआय काही प्रमाणात कमी होऊन 52.3 इतका मोजला गेला आहे. जुलै महिन्यातील या क्षेत्राचा पीएमआय 55.3 इतका होता. याचा अर्थ जुलै महिन्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील ऑर्डर्स कमी होऊ लागल्या असल्याचे दिसून येत आहे.
समाधानाची बाब म्हणजे हा निर्देशांक अजूनही 50 अंकांच्या वर आहे. हा निर्देशांक 50 अंकांच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. करोना विषयक परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नसल्यामुळे कारखान्याकडे कमी ऑर्डर येत आहेत. त्याचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याचे दिसून येत आहे.
ज्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र कमी उत्पादक होत आहे त्या प्रमाणात रोजगार निर्मिती वरही परिणाम होणे अपेक्षित आहे. देशांतर्गत ऑर्डरबरोबरच परदेशातून मिळणाऱ्या ऑर्डरवर परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर कच्च्या मालाचे दर वाढत असल्यामुळेही वाहन क्षेत्रात सारख्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर बराच परिणाम होत आहे.
आगामी काळातही काळातही परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वाढावे याकरिता याकरिता केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुढाकार घेण्याची शक्यता आहे. कारण आगामी काळामध्ये विकास दर वाढत राहावा अशी सरकारची इच्छा आहे. त्याचबरोबर भांडवल कमी पडणार नाही असे आश्वासन कालच रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिले आहे. या आकडेवारीच्या आधारावर रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आगामी काळात काही उपाययोजना करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.