नवी दिल्ली – दुसर्या तिमाहीत भारताचा विकास दर वाढला असतानाच मार्च महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता वाढून 16 वर्षाच्या उच्चांकावर गेली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये भारतातील सेवा क्षेत्र आणि मनुफॅक्चरिंग क्षेत्र राष्ट्रीय उत्पन्नात मोठे योगदान देण्याची शक्यता आहे. जर जूनमध्ये पाऊस चांगला पडला तर कृषी क्षेत्राची उत्पादकता वाढून राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार असल्याचे दिसून येते. (Manufacturing sector productivity hits 16-year high in March)
मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक म्हणजे एचएसबीसी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग परचेसिंग मॅनेजर इंडेक्स मार्च महिन्यामध्ये 59.1 इतका मोजला गेला आहे. हा सोळा वर्षाचा उच्चांक आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये हा निर्देशांक 56.9 इतका होता. देशभरातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या परचेसिंग मॅनेजर बरोबर चर्चा करून हा निर्देशांक तयार केला जातो.
आता मागणी वाढत आहे. त्यामुळे आगामी काळातही या क्षेत्राची उत्पादकता वाढत असल्याचे या निर्देशांकातून स्पष्ट होते. हा निर्देशांक 50 अंकाच्या वर असल्यानंतर हे क्षेत्र वाढत असल्याचे समजले जाते. विशेष म्हणजे गेल्या 33 महिन्यापासून हा निर्देशांक 50 अंकाच्यावर आहे. त्याचबरोबर 2008 पासून प्रथमच हा निर्देशांक सध्याच्या उच्च पातळीवर गेला असल्याचे हा निर्देशांक तयार करणार्या संस्थेने म्हटले आहे.
एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचे योगदान वाढावे यासाठी केंद्र सरकार गेल्या पाच वर्षापासून प्रयत्न करत आहे. कारण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. आता सरकारच्या या प्रयत्नांना यश मिळत असल्याचे दिसून येत आहे.
परदेशातून मागणी वाढली –
आतापर्यंत निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळत नव्हत्या. फक्त देशांतर्गत मागणीच्या आधारावर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वाढत होते. मात्र आता परदेशातील परिस्थिती सकारात्मक झाली असून परदेशातूनही ऑर्डर मिळत आहेत. लवकरच देशात आणि परदेशात व्याजदरात कपात होणार आहे. अशा परिस्थितीत मागणीत आणखी वाढ होऊ शकते. असे झाले तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता आणखी वाढू शकते.