सप्टेंबरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय वाढला
नवी दिल्ली – सप्टेंबर महिन्यात कारखान्यातील काम वेगाने वाढले आहे. या महिन्यातील मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता (पीएमआय) 56.8 मोजली गेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ही उत्पादकता 52 इतकी होती.
गेल्या साडेआठ वर्षाच्या काळात एखाद्या महिन्यात या क्षेत्राची उत्पादकता इतक्या मोठ्या प्रमाणात प्रथमच वाढली असल्यामुळे सरकार आणि उद्योजकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजे पीएमआय तयार करणाऱ्या आयएचएस मार्केट संस्थेचे संचालक लिमा यांनी सांगितले की, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ही अतिशय उत्साहवर्धक बाब आहे.
पीएमआय 50 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यानंतर हे क्षेत्र विस्तारत असल्याचे समजले जाते. 35 महिन्यांपासून पीएमआय निर्देशांक 50च्या वर होता. मात्र, एप्रिल महिन्यात तो बराच कमी झाला होता. आता परिस्थिती पूर्ववत झाली असल्याचे दिसून येते. देशांतर्गत ऑर्डरबरोबरच परदेशातूनही ऑर्डर वाढू लागल्या आहेत.