मुंबई – कोविड विषाणूचे नवीन प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. अमेरिकासह, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका, ब्राझिल, बांगलादेश, बोत्स्वाना, चीन, मॉरिशस, न्यूझीलॅंड, झिम्बाब्वे या देशांमधून मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आगमनानंतर स्वखर्चाने आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार हवाई प्रवास करुन येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची तरतूद रद्द करण्यात आली आहे. पण त्यांची करोना चाचणी मात्र बंधनकारक आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारे हा निर्णय घेण्यात आला असून खालील नमूद केल्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिनांक 3 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीपासून हा नियम लागू राहणार आहे.
चाचणीच्या अनुषंगाने, याआधीच्या परिपत्रकांनुसार अपवाद करण्यात आलेले सर्व निर्णय आता रद्दबादल करण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना लस घेतलेले, दोन्ही डोस घेतलेले किंवा अन्य कुठलाही पर्याय आता नाही.
याशिवाय या सर्व प्रवाशांना स्वयंघोषणा-पत्र आणि हमीपत्र भरून मुंबई विमानतळावर अधिकाऱ्यांकडे देणे आवश्यक असेल आणि या प्रवाशांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहणेही बंधनकारक असेल. या सर्व प्रवाशांच्या करोना चाचणीची सोय विमानतळावर करण्यात आली आहे.