पुणे -“मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर 2021 मध्ये “जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट रसिकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचे उत्कंठावर्धक पोस्टर नुकतेच प्रदर्शित केले.
“मुळशी पॅटर्न’ या चित्रपटापाठोपाठ युवा उद्योजक आणि निर्माते पुनीत बालन यांच्या “पुनीत बालन स्टुडिओज’च्या आगामी “जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी केले असून, प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी संगीत दिले आहे.
मराठीसह बॉलीवूडमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या लिमये यांना “यलो’ या संवेदनशील विषयावरील चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले आहे. पुन्हा महेश लिमये दिग्दर्शक म्हणून “जग्गु आणि ज्युलिएट’ या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. तर, अनोख्या आणि खास संगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे संगीतकार अजय-अतुल यांचे बहारदार संगीत आणि पार्श्वसंगीताची खास पर्वणी ठरणार आहे.
महेश लिमये, गणेश पंडित आणि अंबर हडप यांची कथा आणि पटकथा असून, त्यातील प्रभावी संवाद गणेश पंडित आणि अंबर हडप यांचे आहेत. निर्माते बालन, दिग्दर्शक लिमये आणि संगीतकार अजय-अतुल यांच्या “आशेची रोषणाई’ या लघुपटालादेखील रसिकांची पसंती मिळाली असून, विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवात या कलाकृतीला पुरस्कारांनी सन्मानित केले. “जग्गू आणि ज्युलिएट’च्या निमित्ताने हे त्रिकुट एकत्र आल्याने चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा वाढली आहे.
पोस्टरबाबत उत्सुकता
नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय असणाऱ्या “जग्गू आणि ज्युलिएट’च्या पोस्टरमध्ये कोणीतरी एकमेकांच्या हातात हात घेतलेले दिसत आहे. त्याला लंडनच्या बिग बेनची पार्श्वभूमी आहे. आकर्षक मांडणीमुळे लक्षवेधी ठरलेल्या या पोस्टरमध्ये दिसणारे ते दोन हात नक्की कुणाचे आहेत? हे अद्याप गुलदस्त्यातच आहेत. या चित्रपटाचे 90 टक्के चित्रीकरण युरोपमध्ये होणार असून, महेश लिमये यांच्या नजरेतून निसर्ग सौंदर्याने नटलेला युरोप या चित्रपटात हटके अंदाजात पाहता येणार आहे.
आमची पहिली निर्मिती असलेल्या “मुळशी पॅटर्न’ या सामाजिक आशयावरील चित्रपटाला रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिला. करोनाकाळात आम्ही सामाजिक संदेश देणाऱ्या तीन शॉर्टफिल्मचीदेखील निर्मिती केली असून, त्यांना जगभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 2021 मध्ये प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी वेगळ्या धाटणीचा “जग्गू आणि ज्युलिएट’ हा चित्रपट घेऊन येत आहोत. यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांना सहकुटुंब बघता येईल अशी एक अतिशय सुंदर, कलरफुल, “रॉमकॉम’ कलाकृती भेट म्हणून देण्याचा आमचा मानस आहे.
– पुनीत बालन, निर्माते