लघु उद्योजकांची महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
पिंपरी – अनेक बैठका, निवेदने, आंदोलने होऊनही उद्योगनगरी अजूनही खंडित वीज पुरवठा या समस्येशी झगडत आहे. वीज पुरवठ्याबाबतच्या समस्यांचे शुक्लकाष्ठ उद्योजकांची पाठ सोडत नसल्याने उद्योजकांनी पुन्हा एकदा महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीज विषयक समस्यांबाबत महावितरणच्या गणेशखिंड कार्यालयाचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांच्या सोबत चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक नवनाथ वायाळ, प्रमोद राणे, विजय भिलवडे, सुर्यकांत पेटकर, विकास नाईकरे, येवले, भट व अनेक उद्योजक उपस्थित होते. तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार, भोसरी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राहुल गवारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता बी.बी.भरणे, उमेश दवडे, चौधरी इ.अधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटनेतर्फे अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांना पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील वीजविषयक समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
उद्योजकांच्या मागण्या
देखभाल दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेऊन ती पूर्ण करावी. वीज वाहिन्यास अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने काढाव्यात. मोडकळीस आलेले फीडर फिलर बदलावेत व देखभाल-दुरुस्ती वेळच्या वेळी करावी. केबल दोष शोधणारे वाहन पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरासाठी तातडीने उपलब्ध करून द्यावे. केबल जोडणारी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. डी.पी.डी.सी.च्या योजनेखाली येणारे रोहित्र बसवावेत. भोसरी सब स्टेशन -2 पेठ क्रमांक 7 मधील फीडर क्रमांक 1 साठी बे ब्रेकर बसवावेत. एलटी, एचटी, केबल उपलब्ध करुन द्यावेत. मोई फीडरला जोडलेला कुदळवाडी ,चिखली औद्योगिक परिसर टाटाफीडरला जोडावा. थ्री फेज मीटर उपलब्ध नसल्यामुळे उद्योगांना अंदाजे वीज बिल दिले जाते त्यामुळे उद्योगांना आर्थिक भुर्दंड बसतो. मीटर उपलब्ध करावेत.
हे दिले आदेश
यावेळी बोलताना अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी विभागवार वीज वाहिनीला अडथला ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे, डीपीमधील फ्युज वायर व इतर साहित्य व्यवस्थित बसवण्याचे, तसेच जादा क्षमतेचे रोहित्र बसवण्याचे आदेश दिले. फिडर पिलरची उंची वाढवणे, पिलर फिडर क्लिपिंग करणे आदींबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. फुज वायर योग्य प्रमाणाचीच वापरावी जास्त जाडे बार वापरू नये, अशी ताकीद दिली. औद्योगिक परिसरात देखभाल दुरुस्तीसाठी मनुष्यबळ व साहित्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी यावेळी दिले. मोई फीडरला जोडलेला कुदळवाडी, चिखली औद्योगिक परिसर टाटा फिडरला येत्या 10 दिवसात जोडण्यात येईल.
टी ब्लॉकमधील प्रियदर्शनी औद्योगिक वसाहतीत जादा क्षमतेचे रोहित्र बसवण्यात येईल. तसेच ज्याचे वीज पुरवठा बंद करावयाचा आहे. त्याचाच बंद झाला पाहिजे त्याचा इतर उद्योगांना त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याची सूचना अधीक्षक अभियंता पंकज तगलपल्लेवार यांनी केली असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेच्या वतीने देण्यात आली.