काटेवाडी, (वार्ताहर)- येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक्स-रे विभागाचे थकित विज बिल न भरल्याने काटेवाडी महावितरण विभागाने वीज खंडित केली असल्याने या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांच्या उपचाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
11 ऑक्टोबर 2022 पासून आजपर्यंत या एक्स-रे विभागाचे थकीत विज बिल भरले गेले नाही. काटेवाडी महावितरण विभागाने वारंवार वीज बिलाची मागणी करूनदेखील आजपर्यंत थकलेले 2 लाख 60 हजार एवढे थकीत वीज बिल भरले गेले नाही. प्रत्येक महिन्यात वीज वितरण विभागाला आश्वासन दिले जात होते की या महिन्यात भरले जाईल, वरिष्ठांशी संपर्क साधला आहे,
संबंधित विभागाच्या खात्यामध्ये पैसे जमा होताच काटेवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक्स-रे विभागातील थकीत वीज बिल तातडीने भरले जाईल असे येथील पशुवैद्यकीय अधिकारी वारंवार सांगत होते. वरिष्ठांकडे विचारणे केले असता जी वरिष्ठ माहिती देतील ती माहिती पशुवैद्यकीय अधिकारी महावितरण वीज विभाग काटेवाडी येथील असलेल्या वीज वितरण विभागाच्या अधिकार्यांना देत होते; परंतु या विभागाला वीजबिल हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिले जाते.
या ठिकाणी काटेवाडी तसेच इतर परिसरातील व वाड्या वस्त्या वरील शेतकरी आपापल्या जनावरांना घेऊन दवाखान्यामध्ये उपचारासाठी घेऊन येत असतात. अनेक वेळा जनावरांना नक्की कोणता आजार झाला आहे तो वरून पाहता समजत नसल्याने या ठिकाणी असलेल्या एक्स-रे ची मोठी गरज भासत आहे.
गेले दीड वर्ष हे एक्स-रे विभाग थकीत वीजबिल न भरल्यामुळे सध्या हे एक्स-रे विभाग महावितरण विभाग काटेवाडीने या विभागाची वीज खंडित केल्याने अनेक शेतकर्यांना आपल्या जनावरांना दवाखान्यात आल्यानंतर उपचारासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. याचा विचार करून तातडीने काटेवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक्स-रे भागातील थकीत वीजबिल भरून या विभागातील वीज जोडणी करावी, अशी मागणी येथील शेतकर्यांनी केली आहे.
आम्ही जिल्हा परिषदकडे येथील असलेल्या एक्स-रे विभागाच्या थकीत वीज बिलाबाबत वारंवार माहिती पाठवून हे बिल त्वरित भरावे, अशी विनंती केली आहे; मात्र या विभागाचे संबंधित अधिकारी यांनी या एक्स-रे विभागासाठी या विभागाशी असलेल्या संबंधित खात्यामध्ये पैसे जमा झाल्यास तातडीने हे थकित वीज बिल भरले जाईल असे सांगित5े. -डॉ. जानकर, पशुवैद्यकीय अधिकारी
साधारण दीड वर्ष होत आले आतापर्यंत या एक्स-रे विभागाचे थकीत वीज बिल भरण्यात आले नसल्याने, काटेवाडी येथील महावितरण विभागाने वारंवार सांगून देखील हे थकित वीज बिल न भरल्याने 21 मार्च 2024 रोजी वीज जोड कनेक्शन बंद करण्यात आले आहे. -सुरेश ठोंबरे, कनिष्ठ अभियंता महावितरण काटेवाडी : पशुवैद्यकीय दवाखान्यातील एक्स-रे विभाग