पिंपरी (प्रतिनिधी) – पुनावळे येथील माय होम को आॅपरेटीव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये ६० किलोवॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे सोसायटी आता विजेसाठी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली आहे. या प्रकल्पामुळे महिना सुमारे साडेसात हजार युनिट वीज निर्मिती होणार असून सोसायटीच्या बिलामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
हा प्रकल्प मंगळवारी (दि. १२) कार्यान्वित करण्यात आला असून या वेळी अधिरा इंटरनॅशनल स्कूल, पुनावळेचे संचालक नवनाथ ढवळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सोसायटी व्यवस्थापकीय समिती व सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते. समितीतर्फे अध्यक्ष मधुर तनेजा, सचिव अतुल माळोदे, कोषाध्यक्ष नीरज पाटील, जयंत मोरे, रुपेश कोल्हे उपस्थित होते.
पुनावळे येथील माय होम कोआॅपरेटिव्ह सोसायटीला दरमहा दीड ते पावणे दोन लाख रुपये वीजबिल येत आहे. सोसायटीमध्ये ६० किलोवॅटचा सोलर प्रकल्प आरे एजन्सीतर्फे राबविण्यात आला. प्रकल्पाचा खर्चही एजन्सीने केला असून याच एजन्सीला योग्य दरात वीज देण्यात येणार आहे. हा करार सोसायटीने सोलर ऑपरेटिंग एजन्सीसोबत दहा वर्षांसाठी केला आहे.
या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा पूर्णपणे एजन्सीतर्फे करण्यात आलेला आहे. तसेच सोसायटीच्या सभासदांकडून कुठलाही अतिरिक्त अधिभार न लावता हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे साडेसात हजार युनीट प्रति महा उत्पन्न होईल. त्यामध्ये जवळपास ४० ते ५० टक्के वीजबिलाची बचत सोसायटीला अपेक्षित आहे. या सोलर प्रकल्पामुळे पुढील काळात सोसायटीचे वीजबिल मोठ्या प्रमाणात कमी होईल.