काठमांडू – नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहाल प्रचंड येत्या १३ मार्चला संसदेमध्ये तिसर् यांदा विश्वासदर्शक ठराव मांडणार आहेत. संसदेमध्ये प्रचंड यांनी नेपाळी कॉंग्रेसबरोबरची आघाडी सोडून माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या सीपीएन-यूएमएल पक्षाशी नवीन आघाडी केली आहे.
पंतप्रधान बनल्यापासून तिसर् यांदा ते विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहेत. शनिवारी झालेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (माओवादी सेंटर) पक्षाच्या संसदीय गटाच्या बैठकीमध्ये प्रचंड यांनी या नवीन आघाडीबाबत चर्चा केली.
विश्वासदर्शक ठरावाच्या दिवसापर्यंत पक्षाच्या सदस्यांनीराजधानी काठमांडू सोडून जावू नये, अशी सूचनाही केली गेली आहे, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. प्रचंड हे नेपाळी काँग्रेसच्या पाठिंब्याने २५ डिसेंबर २०२२ रोजी तिसऱ्या टर्मसाठी पंतप्रधान झाले. त्यांचा पक्ष हा प्रतिनिधीगृहातील तिसरा सर्वात मोठा गट आहे.
२०१७ च्या निवडणुकीत, प्रचंड आणि ओली यांनी त्यांच्या पक्षांचे विलीनीकरण केले आणि आरामात बहुमत मिळवले. ओली पंतप्रधान झाले, परंतु त्यांच्यातील मतभेदांमुळे त्यांची भागीदारी अर्धवटच संपली.
गेल्या वर्षी, सीपीएन-यूएमएलने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रमुख विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावरून झालेल्या मतभेदानंतर प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतल्यानंतर प्रचंड यांना दुसर् यांदा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले होते. आता ओली आणि प्रचंड पुन्हा एकत्र आले आहेत.